ऑस्ट्रेलियाविरुद्ध १९८१मध्ये मेलबर्नला झालेल्या क्रिकेट कसोटीत बाद झाल्यानंतरही पंचांच्या निर्णयाचा निषेध म्हणून मी बराच वेळ खेळपट्टीवर थांबलो होतो. या वर्तनाबद्दल मला आता पश्चात्ताप वाटत आहे, असे भारतीय संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी सांगितले.
या सामन्यात डेनिस लिली यांच्या गोलंदाजीवर गावस्कर पायचीत झाले होते. पंच रेक्स व्हाइटहेड यांनी हात वर करीत गावसकर पायचीत झाल्याचा निर्णय दिला. मात्र आपण नाबाद आहोत असे वाटून गावसकर हे बराच वेळ मैदानावर थांबले होते, तरीही पंचांनी निर्णय बदलला नाही म्हणून गावसकर यांनी आपला सहकारी चेतन चौहान याच्यासह पॅव्हेलियनकडे परतण्यास सुरुवात केली. सीमारेषेअगोदर भारताचे संघव्यवस्थापक शाहिद दुराणी व सहायक व्यवस्थापक बापू नाडकर्णी यांनी गावस्कर यांना समजावून सांगितले तसेच चौहान यांना पुन्हा खेळपट्टीवर जाण्यासंबंधी सूचना केल्या.
या कृतीबद्दल गावस्कर म्हणाले की, ‘‘कर्णधार म्हणून मी असे वर्तन करायला नको होते. मी खरोखरीच बाद होतो किंवा नाही यापेक्षाही पंचांचा निर्णय सर्वोच्च असतो व त्याचे पालन करणे अनिवार्य असते हे मला त्या वेळी पटकन लक्षात आले नव्हते. ही घटना मला सतत बोचत राहिली आहे.’’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा