यंदाच्या जुलै महिन्याचा पहिला दिवस वेस्ट इंडिजचे क्रिकेटपटू कधीच विसरू शकणार नाहीत. याच दिवशी आपण भारतात होणारा वर्ल्डकप खेळू शकणार नाही हे स्पष्ट झालं. झिम्बाब्वे, नेदरलँड्स आणि स्कॉटलंडविरुद्ध पराभूत झाल्याने वेस्ट इंडिजचा संघ वर्ल्डकप स्पर्धेसाठी पात्र ठरू शकला नाही. १९७५ ते २०२३ या ४८ वर्षांच्या वर्ल्डकप इतिहासात पहिल्यांदाच वर्ल्डकप स्पर्धेत वेस्ट इंडिजचा संघ नसेल. प्रमुख संघापैकी एक असलेल्या वेस्ट इंडिजला वर्ल्डकपमध्ये खेळण्यासाठी पात्रता फेरी स्पर्धेत खेळावं लागणं हीच नामुष्की होती. या स्पर्धेत जेतेपदासह वेस्ट इंडिजचा संघ वर्ल्डकपमध्ये दिमाखात प्रवेश करेल अशी चाहत्यांना अपेक्षा होती. पण तसं झालं नाही आणि वेस्ट इंडिजला गतवैभवातच रमावं लागेल हे पक्कं झालं.

पहिलावहिला वर्ल्डकप वेस्ट इंडिजने जिंकला. चार वर्षानंतर त्याच वर्चस्वाने खेळत दुसराही वर्ल्डकप जिंकला. सत्तर, ऐंशी आणि नव्वदीच्या दशकापर्यंत वेस्ट इंडिजचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर दबदबा होता. विविअन रिचर्ड्ससारखा दिग्गज फलंदाज, गॉर्डन ग्रीनिज आणि डेसमंड हेन्स ही बिनीची जोडी, क्लाईव्ह लॉईडसारखा चतुर कर्णधार, जोएल गार्नर, मायकेल होल्डिंग, कॉलिन क्राफ्ट आणि अँडी रॉबर्ट्स, माल्कम मार्शल हे आग ओकणारे गोलंदाज. वेस्ट इंडिजचा सामना म्हटला की त्यांचा विजय पक्का असायचा. त्यांच्या गोलंदाजांचा सामना करताना फलंदाज जखमी व्हायचे. प्रतिस्पर्ध्यांवर त्यांची दहशत होती. २०१० मध्ये प्रदर्शित झालेल्या फायर इन बॅबिलोन डॉक्युमेंट्रीत वेस्ट इंडिजच्या वर्चस्वाची झलक अनुभवायला मिळते.

Varun Chakaravarthy trains with ODI squad in Nagpur ahead of India vs England series
IND vs ENG: भारताचा मिस्ट्री स्पिनर अचानक इंग्लंडविरूद्ध वनडे संघात दाखल, BCCIने केलं जाहीर; कसा आहे संपूर्ण संघ?
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
IND vs ENG Yuvraj Singh praises Abhishek Sharma innings against England at Wankhede stadium
IND vs ENG : ‘मला तुझ्याकडून हेच…’, अभिषेक शर्माच्या ऐतिहासिक शतकानंतर ‘गुरु’ युवराज सिंगने केले कौतुक
IND vs ENG Saqib Mahmood Triple Maiden Wicket Over
IND vs ENG: कानामागून आला, भारी पडला! व्हिसा दिरंगाई बाजूला सारत मेहमूदने भारताची उडवली दाणादाण, ३ चेंडूत ३ विकेट
SL vs AUS Josh Inglis scores century on debut test match in front of parents breaks many records at Galle
SL vs AUS : जोश इग्लिसचे कसोटी पदार्पणात विक्रमी शतक! मोडले अनेक विक्रम
Hardik Pandya knock put pressure on other India batters say Parthiv Patel after Team India defeat against England
IND vs ENG : ‘त्याच्या संथ खेळीमुळे इतर फलंदाजांवर दबाव वाढला,’ माजी खेळाडूने भारताच्या पराभवाचे खापर हार्दिकवर फोडले
West Indies Beat Pakistan by 120 Runs Records Historic Win at Multan Test After 35 Years
PAK vs WI: वेस्ट इंडिजचा पाकिस्तानवर ३५ वर्षांनी ऐतिहासिक कसोटी विजय, यजमान स्वत:च्याच जाळ्यात अडकले; सामन्यात नेमकं काय घडलं?
IND vs ENG Suryakumar Yadav shed light on the situation, revealing that the exclusion of Mohammed Shami was purely a tactical decision
IND vs ENG : मोहम्मद शमी फिट की अनफिट? पहिल्या सामन्यातून वगळण्याबाबत सूर्यकुमार यादवने केला खुलासा

आणखी वाचा: World Cup Cricket : पेटलेलं इडन गार्डन्स आणि ओक्साबोक्शी रडणारा विनोद कांबळी

१९७६ ते १९८६ या दशकभरात वेस्ट इंडिजने १७ पैकी १५ कसोटी मालिका जिंकल्या. याच काळात त्यांनी वनडे क्रिकेटमध्ये दोन वर्ल्डकप नावावर केले. १९८३ वर्ल्डकपमध्येही ते फायनलमध्ये होतेच. भारतीय संघाने दमदार सांघिक खेळ करत बलाढ्य वेस्ट इंडिजला नमवण्याची किमया केली होती. १९७५ ते १९८७ या कालावधीत वेस्ट इंडिजने खेळलेल्या वनडे सामन्यांपैकी ७४ टक्के सामने जिंकले. वेस्ट इंडिज क्रिकेटचा तो सुवर्णकाळ होता. दर्जेदार खेळाडू, दडपणाच्या क्षणी कामगिरी उंचावण्याची हातोटी, अफलातून फिटनेस आणि कमालीचं सातत्य यामुळे वेस्ट इंडिजच्या संघाचा अचंबा वाटायचा.

पण जसे हे खेळाडू निवृत्त होऊ लागले, संघ बदलला तसं वेस्ट इंडिज क्रिकेटमध्ये बदल घडू लागले. एकेकाळी ज्यांनी क्रिकेटजगतावर अधिराज्य गाजवलं त्या वेस्ट इंडिजला २००० ते आतापर्यंत झालेल्या ४७५ वनडे सामन्यांपैकी २६४मध्ये पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. ज्यांच्या नावावर दोन विश्वविजेतेपदं आहेत त्या वेस्ट इंडिजची वर्ल्डकपमधली कामगिरीही खालावतच जाणारी आहे. वर्ल्डकप स्पर्धेत वेस्ट इंडिजने ८० सामने खेळलेत. यापैकी ३५ मध्ये त्यांचा पराभव झाला आहे.

पण ही घसरण काही दिवसात झालेली नाही. अनेक वर्षांतील सामाजिक, आर्थिक, राजकीय घडामोडींचा परिपाक म्हणजे ही अवस्था आहे. गेल्या वर्षी झालेल्या ट्वेन्टी२० विश्वचषकासाठीही वेस्ट इंडिजला पात्र होता आलं नाही. त्यातून बोध घेत परिस्थिती सुधारेल असं वाटलं होतं पण चाहत्यांच्या पदरी निराशाच पडली.

आणखी वाचा: Cricket World Cup: जेव्हा ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिजने श्रीलंकेत खेळायला नकार दिला होता

वेस्ट इंडिज हा देश नाही. कॅरेबियन आयलंड्स अर्थात अनेक बेटांचा समूह आहे. प्रत्येक बेट हा स्वतंत्र देश आहे. अन्य खेळांमध्ये स्वतंत्र देश म्हणूनच प्रतिनिधित्व करतात पण क्रिकेटच्या मैदानात एकत्र येऊन वेस्ट इंडिज म्हणून खेळतात. वेस्ट इंडिज देश नसल्याने त्यांच्या सामन्यावेळी एक समूहगीत गायलं जातं. वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाची आर्थिक स्थिती बरी नाही. बोर्ड आणि खेळाडू यांच्यात मानधनाच्या मुद्यावरून प्रदीर्घ काळ वाद सुरू आहे. वेस्ट इंडिजसाठी करारबद्ध होऊन खेळण्यापेक्षा जगात विविध ठिकाणी सुरू असलेल्या ट्वेन्टी२० लीग खेळून भरपूर पैसा मिळत असल्याने वेस्ट इंडिजच्या खेळाडूंचं प्राधान्य बदललं. कायरेन पोलार्ड, आंद्रे रसेल, सुनील नरिन, ड्वेन ब्राव्हो हे खेळाडू आयपीएलसह जगभरात ट्वेन्टी२० लीग खेळतात पण वेस्ट इंडिजसाठी खेळण्यासाठी त्यांना वेळ नसतो. समाधानकारक पैसा मिळत नसेल तर खेळाडूंसमोर लीगमध्ये खेळणं हाच उतारा आहे. पैसा असेल तर स्पर्धांचं आयोजन, मैदानांची उभारणी, प्रतिभाशोध कार्यक्रम, चांगले प्रशिक्षक आणि तंत्रज्ञ यांची नियुक्ती अशा सगळ्या गोष्टी करता येतात. पण आयसीसीचं सध्याचं आर्थिक प्रारुप हे बिग थ्री अर्थात भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड केंद्रित आहे. वेस्ट इंडिजला मिळणारा वाटा ४.५८ टक्के इतकाच आहे.

दोन वेळा विश्वविजेते राहिलेल्या वेस्ट इंडिजची घसरण
वेस्ट इंडिजची घसरण

चांगले खेळाडू घडण्यासाठी तशी व्यवस्था उभी करावी लागते. त्यासाठीचा पैसा वेस्ट इंडिज बोर्डाकडे नाही. वेस्ट इंडिजकडे गुणवान खेळाडूंची कमतरता नाही. पण या खेळाडूंना आर्थिक स्थैर्य मिळवून देणं बोर्डाला शक्य नाही. वेगवेगळ्या बोर्डांचं मिळून प्रशासन तयार झालं आहे. हा एक विस्कळीत ढाचा आहे. त्याचा फटका खेळाडूंना बसतो. वेस्ट इंडिजचे क्रिकेटपटू अन्य देशात जाऊन खेळत असल्याचंही चित्र समोर येतं आहे. २०१९ वर्ल्डकप स्पर्धेत वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने इंग्लंडला जिंकून देण्यात मोलाची भूमिका बजावली होती. आर्चर हा वेस्ट इंडिजचा आहे. त्याचा सहकारी ख्रिस जॉर्डनही वेस्ट इंडिजचाच आहे. चांगला पैसा, संधी, स्थैर्य, जीवनशैली मिळत असल्याने या दोघांनी इंग्लंडसाठी खेळण्याचा निर्णय घेतला.

आणखी वाचा: Cricket World Cup: पाऊस जेव्हा दक्षिण आफ्रिकेच्या विजयाचा घास हिरावतो

वेस्ट इंडिज बेटांवर बास्केटबॉल, फुटबॉल यांची लोकप्रियता वाढणं हाही महत्त्वाचा मुद्दा आहे. वेस्ट इंडिज आणि अमेरिका यांच्यातलं भौगोलिक अंतर किती कमी आहे हे नकाशा पाहिल्यावर समजतं. फुटबॉल आणि बास्केटबॉल संस्कृती वेस्ट इंडिज अर्थात कॅरेबियन बेटांवर रुजल्याने क्रिकेटमधलं स्वारस्य कमी होत गेलं.

२०१९ मध्ये वर्ल्डकप झाला होता. त्या स्पर्धेपासून आतापर्यंत चार वर्षात वनडेत सर्वाधिक धावा वेस्ट इंडिजच्या शे होपच्या नावावर आहेत.पण तो या वर्ल्डकपमध्ये खेळणारच नाहीये. या चार वर्षात वनडेत सर्वाधिक विकेट्स पटकावणाऱ्यांच्या यादीत वेस्ट इंडिजचा अल्झारी जोसेफ तिसऱ्या स्थानी आहे. पण तोही वर्ल्डकपमध्ये दिसणार नाही. खेळाडू वैयक्तिक पातळीवर उत्तम कामगिरी करत आहेत पण संघ म्हणून कमी पडत आहेत. हे आकडेवारीतून सिद्ध होत आहे. या चार वर्षात वेस्ट इंडिजने ५७ वनडे सामने खेळलेत आणि ३२ मध्ये त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं आहे.

वनडेत ही नामुष्की ओढवलेल्या वेस्ट इंडिजने ट्वेन्टी-२० प्रकारात चांगली सुरुवात केली होती. वेस्ट इंडिजने २०१२ आणि २०१६ मध्ये ट्वेन्टी२० विश्वचषक जिंकला पण त्यानंतर या प्रकारातही त्यांची घसरणच झाली.

यंदाचा वर्ल्डकप भारतात होतो आहे. वेस्ट इंडिजचे सगळे प्रमुख खेळाडू आयपीएल स्पर्धेत खेळतात. इथल्या वातावरणाची आणि खेळपट्यांची त्यांना माहिती झाली आहे. हा अनुभव वर्ल्डकपदरम्यान कामी आला असता. पण तसं झालं नाही. पहिलाच वनडे वर्ल्डकप असेल ज्यात खेळा-नाचा प्रवृत्तीने खेळणारी खुल्या मनाची कॅरेबियन मंडळी नसतील.

Story img Loader