‘खेळाडूंवर कसा अन्याय होतो हे तुम्ही कॅरेबियन क्रिकेटच्या चाहत्यांना आणि समस्त क्रिकेटविश्वाला पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे. अनाकलनीय आणि अतर्क्य असा हा निर्णय आहे. वेस्ट इंडिजचा ट्वेन्टी२० संघ रसातळाला असताना रोव्हमन पॉवेलने कर्णधारपदाचा काटेरी मुकूट स्वीकारला. त्याने संघाची मोट बांधली. संघ जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानी पोहोचला. त्याच रोव्हमन पॉवेलला कर्णधारपदावरून दूर करण्यात आलं आहे. ज्या खेळाडूने तुम्हाला पडत्या काळात साथ दिली, त्याला अशी वागणूक देता, त्याची अशी किंमत करता’, अशा शब्दात वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ड्वेन ब्राव्होने आपला संताप व्यक्त केला आहे.

वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने टी२० कर्णधारपदावरून रोव्हमन पॉवेलची हकालपट्टी केली आहे. टी२० कर्णधार म्हणून शे होपची निवड व्हावी अशी शिफारस मुख्य प्रशिक्षक डॅरेन सॅमी यांनी केली आहे. कसोटी कर्णधार क्रेग ब्रेथवेटने राजीनामा दिला आहे. कसोटी कर्णधारासंदर्भात अद्याप निर्णय जाहीर झालेला नाही.

ड्वेन ब्राव्हो २०१२ आणि २०१६ टी२० विश्वचषक विजेत्या संघाचा भाग होता. वेस्ट इंडिजचं कर्णधारपदही त्याने भूषवलं आहे. आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स या संघांच्या विजयातही त्याने निर्णायक भूमिका बजावली आहे. आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स पटकावणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत प्रदीर्घ काळ ब्राव्होचं नाव अव्वलस्थानी होतं. अलीकडेच युझवेंद्र चहलने ब्राव्होचा विक्रम मोडला.

वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्ड आणि खेळाडू यांच्यातील बेबनाव गेली अनेक वर्ष खदखदतो आहे. वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाची आर्थिक स्थिती बरी नाही. वेस्ट इंडिजच्या बहुतांश खेळाडूंनी जगभरात होणाऱ्या टी२० लीगला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे वेस्ट इंडिजचा संघ कमकुवत झाला आहे.

योगायोग म्हणजे रोव्हमन पॉवेल आयपीएलमधल्या कोलकाता नाईट रायडर्स संघाचा भाग आहे. तडाखेबंद फटकेबाजी तो ओळखला जातो. रोव्हमनने ३७ टी२० सामन्यात वेस्ट इंडिजचं प्रतिनिधित्व केलं आहे. २०२३ मध्ये त्याने वेस्ट इंडिजच्या टी२० कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारली. रोव्हमनच्या नेतृत्वात वेस्ट इंडिज संघाने कामगिरीत सुधारणा करत आगेकूच केली. ब्राव्हो कोलकाता नाईट रायडर्स संघाचे मेन्टॉर म्हणून काम पाहत आहेत. रोव्हमनला टी२० कर्णधारपदावरून दूर केल्याने ब्राव्हो यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.

२०२२-२३ हंगामात रोव्हमन दिल्ली कॅपिटल्स संघाचा भाग होता. गेल्या हंगामात तो राजस्थान रॉयल्सकडून खेळला. लिलावात कोलकाता नाईट रायडर्स संघाने १.५ कोटी रुपये खर्चून त्याला संघात समाविष्ट केलं.