सुवर्णपदकाने शेवट करण्याचा निर्धार
रिओ ऑलिम्पिक स्पर्धा ही कारकीर्दीतील अखेरची ऑलिम्पिक स्पर्धा असल्याचे मत भारताचा ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तिपटू योगेश्वर दत्त याने व्यक्त केले. त्यामुळे कसून मेहनतीसह रिओमध्ये सुवर्णपदक पटकावण्याचा निर्धार त्याने बोलून दाखवला. ‘‘रिओ ही माझी शेवटची ऑलिम्पिक स्पर्धा असू शकते आणि सुवर्ण पदकाने शेवट गोड करण्यासाठी मी अत्यंत उत्सुक आहे. त्यामुळे संपूर्ण लक्ष तयारीवर केंद्रित केले आहे,’’ असे तो म्हणाला.
ऑलिम्पिकनंतर आपण निवृत्ती घेणार नसल्याचे या ३२ वर्षीय कुस्तिपटूने स्पष्ट केले आणि शरीराने साथ दिल्यास आशियाई व राष्ट्रकुल स्पध्रेत सहभाग घेणार असल्याचेही त्याने सांगितले. तो म्हणाला, ‘‘रिओ ऑलिम्पिकनंतर मी निवृत्त होणार नाही. राष्ट्रकुल आणि आशियाई स्पध्रेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याची इच्छा आहे, परंतु ऑलिम्पिकचा विचार केल्यास रिओ ही अखेरची स्पर्धा आहे, हे निश्चित.’’
२०१२च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणारा योगेश्वर ऑलिम्पिक पात्रता फेरीच्या तयारीसाठी दोन महिने परदेशात प्रशिक्षण घेण्यासाठी जाणार आहे. ‘‘पुढील चार महिने माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. व्यावसायिक कुस्ती लीगनंतर सरावासाठी दोन महिने परदेशात जाणार आहे. मार्चमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक पात्रता फेरीच्या तयारीसाठी अमेरिका किंवा रशिया येथे जाण्याची शक्यता आहे.’’ १८ ते २० मार्च, २०१६मध्ये अस्ताना, कझाखस्तान येथे होणाऱ्या आशियाई ऑलिम्पिक पात्रता स्पध्रेत योगेश्वर सहभाग घेणार आहे.
योगेश्वरला तंदुरुस्तीच्या कारणास्तव गत महिन्यात अमेरिकेत झालेल्या जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पध्रेतून माघार घ्यावी लागली होती. त्यामुळे निराश झाल्याचे योगेश्वरने सांगितले. तो म्हणाला, ‘‘तो प्रसंग वेदनादायी आणि निराशाजनक होता. या स्पध्रेतून रिओ ऑलिम्पिकची पात्रता सहज मिळवू शकत होतो, असा विश्वास असताना माघार घ्यावी लागल्याने निराश झालो. जागतिक स्पध्रेसाठी कसून सरावही केला होता, परंतु डॉक्टरांनी यात सहभाग न घेण्याचा सल्ला दिला होता.’’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा