Rahul Dravid on Semi Final match: २०२३च्या विश्वचषकात भारतीय संघाने अप्रतिम कामगिरी केली आहे. त्याने सलग ९ सामने जिंकून इतिहास रचला आहे. भारतीय संघ आता पहिल्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडचा सामना होईल. हा सामना १५ नोव्हेंबर रोजी रोहित शर्माच्या होम ग्राउंड वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. बंगळुरू येथे झालेल्या विश्वचषकातील शेवटच्या साखळी सामन्यात नेदरलँड्सवर शानदार विजय मिळवल्यानंतर भारताचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी न्यूझीलंडला एकप्रकारे इशारा दिला. “विश्वचषकाच्या उपांत्य फेरीतील सामन्यात दडपण हाताळण्यात भारतीय संघ तयार आहे. टीम इंडिया आत्मविश्वासाने विश्वचषकातील सर्व सामन्यांना सामोरे जात असल्याचे,”द्रविडने सांगितले.
टीम इंडिया २०२३च्या विश्वचषक स्पर्धेतील आतापर्यंतचा सर्वात यशस्वी संघ आहे. या स्पर्धेत आतापर्यंत एकही सामना न गमावलेला हा एकमेव संघ आहे. पण, आता क्रिकेट चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढले आहेत. यामागील कारण म्हणजे साखळी टप्प्यातील भारताच्या अजिंक्य कामगिरीनंतर, रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघासमोर न्यूझीलंडविरुद्ध विश्वचषक २०२३च्या उपांत्य फेरीच्या रूपात कठीण आव्हान आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे २०१९च्या उपांत्य फेरीचा फ्लॅशबॅक, जो भारतीय संघाची डोकेदुखी ठरू शकतो.
पुन्हा एकदा विश्वचषकाचा टप्पा आणि उपांत्य फेरीत न्यूझीलंड-भारत आमनेसामने आहेत. पण, नॉकआऊट सामना असल्यामुळे टीम इंडियावरही काही प्रमाणात दडपण असेल. मात्र, टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड हे थोडे आत्मविश्वासू वाटले. त्यांनी विश्वचषक उपांत्य फेरीतील दबाव हाताळण्याच्या भारताच्या क्षमतेवर विश्वास व्यक्त केला आहे.
स्टार स्पोर्ट्सशी बोलताना राहुल द्रविड म्हणाला, “मला वाटतं की हे फक्त दु:ख आहे असं म्हणणं योग्य ठरणार नाही. होय, नक्कीच २०१९साली आम्ही उपांत्य फेरीत पराभूत झालो होतो. पण मला वाटतं की, यावेळची परिस्थिती वेगळी आहे. आमच्या खेळात कुठलाही बदल होणार नाही. आम्ही हे मान्य करतो की, हा एक महत्त्वाचा सामना आहे. काही प्रमाणात दडपण असणार आहे हे सत्य स्वीकारावे लागेल.”
भारतीय संघाने विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत ज्या प्रकारे कामगिरी केली आहे, त्यामुळे संघात खूप आत्मविश्वास आहे, त्यामुळेच सर्वजण उपांत्य फेरीसाठी सज्ज झाले आहेत, असे द्रविडचे मत आहे. त्याने आगामी सामन्यासाठी टीम इंडियाच्या प्लॅन्सबद्दलही सांगितले. द्रविड पुढे असं म्हणाला की, “जरी दबाव असला तरी उत्तर कसे द्यायचे हे आम्हाला माहिती आहे.”
द्रविड म्हणाला, “आम्हाला माहीत आहे की हा एक महत्त्वाचा आणि बाद फेरीचा सामना आहे. काही प्रमाणात दडपण असेल हे मान्य करावे लागेल, पण मला वाटते की आम्ही आतापर्यंत ज्या पद्धतीने दबावाला प्रतिसाद दिला आहे. तो आम्हाला खूप आत्मविश्वास देईल आणि संघाच्या दृष्टिकोनात किंवा तयारीत कोणताही बदल होणार नाही.” श्रेयस अय्यरच्या सातत्यपूर्ण कामगिरीवर द्रविडने समाधान व्यक्त केले. तो म्हणाला की, “श्रेयस अय्यर हा आमच्या मधल्या फळीचा कणा आहे आणि गेल्या १० वर्षांपासून आम्हाला चौथ्या क्रमांकावर चांगला फलंदाज मिळणे किती कठीण होते हे आम्हा सर्वांना माहीत आहे.”