आयपीएलच्या गव्हर्निग काऊन्सिलने श्रीलंकेच्या खेळाडूंना चेन्नईत खेळण्याची परवानगी नाकारली असून याबाबत फिरकीचा अनभिषिक्त सम्राट मुथय्या मुरलीधरनने नाराजी व्यक्त केली आहे. ‘क्रिकेटसाठी हा दु:खद दिवस आहे,’ असे मुरलीधरनने म्हटले आहे.
श्रीलंकेतील तामिळी जनतेवर अत्याचार सुरू असल्यामुळे तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी श्रीलंकेचे खेळाडू, पंच आणि अधिकारी यांच्यासाठी राज्यात प्रवेशबंदी करण्यात आली असून याबाबतचे पत्र त्यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना धाडले आहे.
आयपीएलमध्ये चेन्नईत श्रीलंकेच्या क्रिकेटपटूंना खेळायची परवानगी नाकारणे हा क्रिकेटसाठी हा दु:खद दिवस आहे. हा निर्णय सरकारचा आहे. त्यामुळे जर ते आम्हाला खेळायची परवानगी आणि सुरक्षा देत असतील तर आम्ही खेळू, अन्यथा आम्हाला जपून राहावे लागेल, असे मुरली म्हणाला. मुरलीधरन हा आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून खेळत असून संघालाही या गोष्टीची समस्या नसल्याचे त्याने सांगितले. तो म्हणाला की, रॉयल चॅलेंजर्स संघाशी माझे बोलणे झाले आहे. चेन्नई वगळता अन्य ठिकाणच्या सामन्यांमध्ये मी खेळणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

श्रीलंकन खेळाडूंनी माघार घ्यावी – रणतुंगा
नवी दिल्ली : चेन्नईत होणाऱ्या सामन्यांमधून श्रीलंकेच्या खेळाडूंना बाहेर ठेवण्याच्या आयपीएल गव्हर्निग कौन्सिलच्या निर्णयाचा निषेध करीत श्रीलंकेचा माजी कर्णधार अर्जुन रणतुंगा याने श्रीलंकेच्या खेळाडूंनी स्पर्धेतूनच माघार घ्यावी, असे आवाहन केले आहे. ‘‘जर आमच्या खेळाडूंचे दक्षिण भारतात स्वागत होणार नसेल, त्यांना अवमानकारक वागणूक मिळणार असेल तर त्यांनी आयपीएलमध्येच भाग घेऊ नये. दक्षिण भारतामधील राजकीय नेत्यांनी श्रीलंकन नागरिकांविरुद्ध हल्लाबोल सुरू केला आहे. याचा आमच्या खेळाडूंनी गांभीर्याने विचार करावा. संपूर्ण स्पर्धेवरच बहिष्कार घालून त्याद्वारे निषेध व्यक्त करावा असे माझे स्पष्ट मत आहे. चेन्नई येथील तणावपूर्ण वातावरण लक्षात घेऊन आयपीएल संयोजन समितीने तेथे यंदा एकही सामना आयोजित करू नये. मात्र तसे न करता आयपीएल संयोजन समिती राजकीय खेळी करीत आहे,’’ असे रणतुंगा यांनी सांगितले. तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी लंकेच्या खेळाडूंचा सहभाग असलेला आयपीएलचा सामना चेन्नईत आयोजित करण्यास विरोध दर्शविला आहे. 

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: This is very sad day for cricket murlidharan