पुजाराच्या नाबाद शतकाने भारताचा डाव सावरला
पहिल्याच दिवशी वळणारा चेंडू.. भारतानेच आखलेल्या फिरकीच्या चक्रव्यूहात एकीकडे त्यांचेच कागदी वाघ धारातीर्थी पडत होते.. इंग्लंडचा संघ पहिल्याच दिवशी भारताला तंबूत धाडण्याचे स्वप्न पाहत होता, तशी चालही ते खेळत होते.. मैदानात स्मशानशांतता पसरलेली होती.. वानखेडेवर भारतीय संघ पुन्हा एकदा पहिल्याच दिवशी डाव गडगडणार, असेच काहीसे चित्र होते.. पण त्या वेळी मैदानात बचाव आणि संयम ही दोन्ही अस्त्रे घेऊन, रणरणत्या उन्हात डोक्यावर बर्फाची लादी ठेवल्याप्रमाणे चेतेश्वर पुजारा हा योद्धा एकटा उभा राहीला आणि त्याने इंग्लंडच्या स्वप्नांचा चुराडा केला.. अप्रतिम पदलालित्य, अचूक ‘टायमिंग’, जमिनीलगतचे पोतडीतले फटके बाहेर काढत पुजारा अपराजीत अभिमन्यू बनला आणि संघाला इंग्लंडच्या फिरकी चक्रव्यूहातून नाबाद शतक झळकावत सहिसलामत बाहेर काढले. त्याला या वेळी कर्णधार धोनी आणि नाबाद अर्धशतक झळकावणाऱ्या आर. अश्विनची चांगली साथ मिळाली. पुजाराचे नाबाद शतक आणि अश्विनच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर भारताला पहिल्या दिवसअखेर ६ बाद २६६ अशी सन्मानजनक धावसंख्या उभारता आली.
सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर गौतम गंभीरने (४) अँडरसनला चौकार ठोकत संघाला आक्रमक सुरुवात करून दिली खरी, पण आक्रमकतेला क्षणभंगुरतेचा शाप असतो आणि याचाच प्रत्यय त्याला त्यानंतरच्याच चेंडूवर आला. शंभरावा कसोटी सामना खेळणाऱ्या वीरेंद्र सेहवागने (३०) तिसऱ्याच चेंडूवर चौकार लगावत त्याच्या खास शैलीने सुरुवात केली. त्यानंतर संघात नव्याने दाखल झालेल्या मॉन्टी पनेसारचे स्वागत सेहवागने मिड ऑनला चौकार लगावत केले, पण याच पनेसारने सेहवागचा त्रिफळा भेदत त्याला तंबूचा रस्ता दाखवला.
सेहवाग बाद झाल्यावर टाळ्यांच्या गजरात सचिन तेंडुलकर (८) आपल्या घरच्या मैदानात उतरला तो वाईट फॉर्मचे चक्रव्यूह भेदण्यासाठीच. सेहवागला जशा खोलवर टप्प्याच्या चेंडूवर बाद केले तसाच चेंडू पनेसारने सचिनला टाकला, पण या परीक्षेत सचिन पास झाला. त्यानंतरच्या मॉन्टीच्या षटकात सचिनने मिड विकेटला चौकार लगावत आपले इरादे स्पष्ट केले खरे, पण त्याच षटकातील पाचव्या चेंडूने सचिनला चकवा दिला. उजव्या यष्टीच्या रेषेत पडणाऱ्या पनेसारच्या चेंडूने डाव्या यष्टीचा वेध घेतला, या वेळी सचिनला हा चेंडू पूर्णपणे कळलाच नाही. त्यामुळे पुन्हा एकदा सचिन त्रिफळाचीत होऊन तंबूत परतला. मॉन्टीने तिसऱ्यांदा सचिनला बाद केले असून पहिल्यांदाच त्याच्या त्रिफळ्याचा वेध घेतला.
सचिननंतर फलंदाजीला आलेल्या विराट कोहलीने (१९) थोडा फार संयम दाखवत पुजाराला साथ देण्याचा प्रयत्न केला खरा, पण मॉन्टीचाच तो शिकार ठरला. कोहलीनंतर फलंदाजीला आलेल्या युवराज सिंगला ग्रॅमी स्वानचा दुसरा चेंडू समजलाच नाही आणि भोपळाही न फोडता त्रिफळाचीत होऊन त्यानेही तंबूचा रस्ता धरला. फिरकीच्या जाळ्यात आता भारतीय संघ सापडणार असे वाटत होते. ४० व्या षटकांत भारताची ५ बाद ११९ अशी अवस्था होती. या दरम्यान पुजाराने मॉन्टीच्या ३५व्या षटकात चौकार ठोकत अर्धशतक साजरे केले. त्यानंतर पुजाराला चांगली साथ लाभली ती कर्णधार महेंद्रसिंग धोनीकडून. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी ५० धावांची भागीदारी रचत संघाला स्थैर्य मिळवून देण्याचा प्रयत्न केला. मॉन्टीच्याच ४७व्या षटकात पुजाराचा झेल अँडरसनने सोडला, तर स्वानच्या ५२व्या षटकात यष्टीरक्षक मॅट प्रायरने धोनीला यष्टीचीत करण्याची संधी गमावली. या दोन्ही जीवदानांनंतर पुजारा आणि धोनीने संयमी खेळ केला आणि चहापानापर्यंत या दोघांनी यशस्वीरीत्या किल्ला लढवला. पण चहापानानंतरच्या दुसऱ्याच षटकात धोनीला मॉन्टीनेच स्वानकरवी झेलबाद करत ही जोडी फोडली आणि भारतीय संघात चिंतेचे वातावरण पसरले.
वानखेडेवरील मागील कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध शतक झळकावणाऱ्या आर.अश्विनने पुजाराला सुयोग्य साथ देत संघाची चिंता दूर केली. या दोघांनी सातव्या विकेटसाठी ९७ धावांची अभेद्य भागीदारी रचत अखेरच्या सत्रात इंग्लंडच्या गोलंदाजांना विकेट मिळवण्यापासून परावृत्त केले. या दोघांनी एकेरी-दुहेरी धाव घेत संघाचा धावलक हलता ठेवण्याची जबाबदारी चोख बजावली. ८०व्या षटकानंतर इंग्लंडने नवीन चेंडू घेतला, तेव्हा त्यांना काही विकेट्स मिळतील असे वाटत होते. पण ८१व्या षटकात अँडरसनचा आखूड टप्प्याचा चेंडू ‘पुल’ करत पुजाराने चौकार वसूल केला आणि आपले शतक साजरे केले. अँडरसनच्या ८३व्या षटकात तर अश्विनने तीन चौकार वसूल करत अर्धशतकाच्या दिशेने कूच केली. त्यानंतर स्टुअर्ट ब्रॉडला चौकार लगावत अश्विनने अर्धशतक साजरे केले आणि संघाला अडीचशे धावांचा टप्पा पार करून दिला. त्यानंतर मात्र या दोघांनी एकेरी-दुहेरी धाव घेत पहिला दिवस खेळून काढण्याचे काम चोख बजावले.
पुजाराने अप्रतिम बचाव आणि संयमाचा नमुना पेश करत २७९ चेंडूंत १० चौकारांनिशी नाबाद ११४ धावांची खेळी साकारली, तर अश्विनने ८९ चेंडूंत ९ चौकार लगावत नाबाद ६० धावांची खेळी साकारून अश्विनला सुरेख साथ दिली. या दोघांच्या खेळींच्या जोरावर भारताला पहिल्या दिवसअखेर ६ बाद २६६ अशी मजल मारता आली. मॉन्टीने यावेळी अप्रतिम गोलंदाजी करत ३४ षटकांत ९१ धावा देत चार फलंदाजांना तंबूत धाडले.
धावफलक
भारत (पहिला डाव) : गौतम गंभीर पायचीत गो. अँडरसन ४, वीरेंद्र सेहवाग त्रिफळा गो. पनेसार ३०, चेतेश्वर पुजारा खेळत आहे ११४, सचिन तेंडुलकर त्रिफळा गो. पनेसार ८, विराट कोहली झे. कॉम्प्टन गो. पनेसार १९, युवराज सिंग त्रिफळा गो स्वान ०, महेंद्रसिंग धोनी झे. स्वान गो. पनेसार २९, आर. अश्विन खेळत आहे ६०, अवांतर (लेग बाइज १, नोबॉल १) २, एकूण ९० षटकांत ६ बाद २६६
बाद क्रम : १-४, २-५२, ३-६०, ४-११८, ५-११९, ६-१६९.
गोलंदाजी : जेम्स अँडरसन १४-३-४९-१, स्टुअर्ट ब्रॉड १२-१-६०-०, मॉन्टी पनेसार ३४-७-९१-४, ग्रॅमी स्वान २६-५-५९-१, समित पटेल ४-१-६-०.