India vs New Zealand, World Cup 2023: भारताचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने कबूल केले की, रविवारी येथे न्यूझीलंडविरुद्धच्या विश्वचषक लढतीत दुखापतग्रस्त अष्टपैलू हार्दिक पांड्याला खेळणार नाही. त्याच्या अनुपस्थितीमुळे संघाच्या संतुलनावर परिणाम होईल, परंतु त्याने उपलब्ध १४ खेळाडूंसह सर्वोत्तम समतोल कसा साधला जाईल यावर भाष्य केलं आहे. बांगलादेशविरुद्धच्या गेल्या सामन्यात गोलंदाजी करताना पांड्याला पायाच्या घोट्याला दुखापत झाली होती आणि तो येथे सध्या संघासोबत धरमशाला येथे आला नाही.
द्रविडने शनिवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, “साहजिकच हार्दिक आमच्यासाठी महत्त्वाचा खेळाडू आहे. तो एक महत्त्वाचा अष्टपैलू खेळाडू आहे त्यामुळे आम्हाला संघाचा समतोल राखण्यास मदत होते. पण तो या सामन्यात खेळू शकणार नाही त्यामुळे आम्हाला ही बाब लक्षात ठेवावि लागेल. सर्वोत्कृष्ट टीम कॉम्बिनेशन कोणते आहे ते पाहावे लागेल.”
प्रशिक्षक द्रविड पुढे म्हणाला की, “शेवटी आम्हाला उपलब्ध असलेल्या १४ खेळाडूंबरोबर काम करावे लागेल,” कधीकधी तुम्हाला माहित नसते की अशा गोष्टी घडू शकतात, म्हणूनच तुमच्याकडे एक परिपूर्ण संघ असला पाहिजे आणि आमच्याकडे आहे. ही परिस्थिती आणि या विकेट्स पाहता सर्वोत्तम संघ काय आहे? यावर विचार करावा लागेल. पण हो, कदाचित पहिल्या चार सामन्यांमध्ये जसा आपण पाहिल्यासारखा समतोल पाहिला तो नसेल.”
जर पांड्या बाहेर पडला तर भारताला एक परिपूर्ण फलंदाज आणि एक परिपूर्ण गोलंदाज संघात सामील करावा लागू शकतो. अशा परिस्थितीत अष्टपैलू शार्दुल ठाकूरला बाहेर बसावे लागेल. शार्दुलच्या संघातील भूमिकेबद्दल द्रविड म्हणाला, “शार्दुलची भूमिका स्पष्ट आहे, तो आमच्यासाठी गोलंदाजी अष्टपैलू आहे. तो खेळलेल्या सामन्यांमध्ये आपण त्याला विकेट्स घेणारा गोलंदाज म्हणून पाहिले आहे. तो आमच्यासाठी मधली षटके टाकतो आणि काही विकेट्स पण मिळवून देतो. तो आमच्यासाठी चौथा वेगवान गोलंदाज आहे.”
द्रविड पुढे म्हणाला, “अर्थात, गेल्या काही सामन्यांत त्याला खालच्या क्रमाने फलंदाजीची संधी मिळाली नाही. पण साहजिकच तो नेटमध्ये त्याच्या फलंदाजीवर खूप मेहनत घेत आहे आणि आम्ही त्याच्यावर लक्ष ठेवून आहोत. काही मोठे फटके मारण्याची क्षमता त्याच्यात आहे, हे आपण पाहिले आहे. तुम्ही सर्वांनी कदाचित कसोटी क्रिकेटमध्ये ते जास्त पाहिले आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये अद्याप इतके नाही कारण त्याला फलंदाजी करण्याची संधी मिळाली नाही. पण गोलंदाजी अष्टपैलूच्या भूमिकेत तो नक्कीच आम्हाला अनुकूल आहे.”
भारताचे मुख्य प्रशिक्षक म्हणाले, “साहजिकच हार्दिक हा आमच्या चार वेगवान गोलंदाजांपैकी एक होता आणि त्याच्या नसल्यामुळे आम्ही कोणत्या समतोलासह जाऊ शकतो हे पाहावे लागेल. आम्ही तीन वेगवान गोलंदाज किंवा तीन फिरकीपटूंबरोबर नक्कीच जाऊ शकतो. या प्रकारच्या कॉम्बिनेशनमुळे, आम्ही अजूनही शार्दुल आणि अश्विनला खेळवू शकतो आणि जडेजाला वरच्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवू शकतो.”
संघाचा थिंक टँक वेगवेगळ्या कॉम्बिनेशनवर विचार करत आहे- राहुल द्रविड
टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणाला, “उद्या आमची प्लेईंग-११ काय असेल याबद्दल आम्ही अगदी स्पष्ट आहोत. पण होय, मला वाटते की आपण भिन्न, भिन्न कॉम्बिनेशनसह जाऊ शकतो. साहजिकच तीन वेगवान गोलंदाजांसह शमीसारख्या खेळाडूला सामन्यात संधी देणे हा उत्तम पर्याय आहे. अश्विनसुद्धा बाहेर बसला आहे जो एक दर्जेदार खेळाडू आहे. त्यामुळे हार्दिक परत येईपर्यंत आम्ही दोन किंवा तीन कॉम्बिनेशन्सचा विचार करू शकतो.”
न्यूझीलंडचे डावखुरे फिरकीपटू आणि लेगस्पिनर्सविरुद्ध इशान किशनला आघाडीच्या क्रमवारीत संधी देण्याबाबत द्रविड म्हणाला, “इशान प्लेईंग-११मध्ये असणे चांगले आहे. सध्या तो चांगला खेळत आहे. तो डावखुरा फलंदाज आहे पण जसे आपण पाहिले की सूर्या (सूर्यकुमार यादव) देखील ऑस्ट्रेलियाविरुद्ध जबरदस्त फॉर्ममध्ये होता. त्याने काही शानदार खेळी खेळल्या. डाव्या हाताची फिरकी किंवा ऑफ स्पिन किंवा कोणत्याही प्रकारच्या फिरकीविरुद्ध त्यानेही मोठे फटके मारले आहेत.”
द्रविड पुढे म्हणाला, “खालच्या आणि मधल्या फळीत संघासाठी उपयुक्त ठरू शकेल अशा एखाद्या व्यक्तीच्या शोधात रोहित असेल तर सूर्या नक्कीच असे करू शकेल. जर तुम्ही मधल्या फळीपेक्षा वरच्या क्रमांकावरील फलंदाजी करणाऱ्या व्यक्तीला शोधत असाल तर कदाचित आम्ही इशानबरोबर जाऊ शकतो. हे फक्त आपण काय विचार करतो यावर अवलंबून आहे.”
द्रविडने फिरकीपटूंना श्रेय दिले
शेवटी द्रविड म्हणाला, “मला आमच्या फिरकीपटूंच्या भूमिकेचे कौतुक करायला आवडेल. मला वाटते की त्यांनी अप्रतिम कामगिरी केली आहे. पहिल्या सामन्यात या तिघांनीही (रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव) ज्या प्रकारे गोलंदाजी केली आणि त्यानंतर आम्ही कुलदीप आणि जडेजाबरोबर पुढच्या तीन सामन्यात खेळलो, पण त्यांनी ज्या पद्धतीने गोलंदाजी केली, हे कौतुकास पात्र आहेत. आम्हाला सामन्यात विजय मिळवून देण्यात त्यांचा खूप मोठा वाटा आहे. त्यांच्यामुळेच खेळावर नियंत्रण ठेवले गेले. त्यांनी दमदार विकेट्स घेतल्या, धावगती कमी केली, मला वाटते हे त्याचे कौशल्य आणि त्याच्या क्षमतेमुळे झाले.”