टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताची कामगिरी चांगली ठरली आहे. टोक्यो ऑलिम्पिकच्या १८ स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडू सहभागी झाले. १३५ कोटी लोकसंख्या असलेल्या भारताकडून यावेळी १२७ स्पर्धकांनी स्पर्धेत भाग घेतला होता. ऑलिम्पिकमधील १८ वेगवेगळ्या स्पर्धेत खेळाडू सहभागी झाले होते. यात तीरंदाजी, एथलिटीक्स, बॉक्सिंग, बॅडमिंटन, इक्वेस्ट्रीयन, फेन्सिंग,गोल्फ, जिम्नास्टीक, हॉकी, ज्युडो, रोविंग, शूटींग, सेलिंग, फेन्सिंग, स्वीमिंग, टेबल टेनिस, वेट लिफ्टिंग आणि कुस्तीचा समावेश होता. ऑलिम्पिक स्पर्धेत सर्वाधिक खेळाडू हे हरयाणा आणि पंजाबमधील होते. भारतीय लोकसंख्येच्या ४.४ टक्के लोकसंख्या असलेल्या पंजाब आणि हरयाणा राज्यातून एकूण ५० खेळाडू टोक्यो ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाले. जवळपास ४० टक्के खेळाडू या दोन राज्यातून देशाच्या ताफ्यात होते. भारताने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये रौप्य (मीराबाई चानू), रौप्य (रविकुमार दहिया), कांस्य (पीव्ही सिंधू), कांस्य (लव्हलिना बोर्गोहेन), कांस्य (भारतीय पुरुष हॉकी संघ) पदकांवर शिक्कामोर्तब केले आहे.
हरयाणाचा कुस्ती संघ हा ऑलिम्पिक संघटना आणि भारतीय कुस्ती महासंघाशी संलग्न आहे. ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक पदक विजेत्यांसोबक सर्वाधिक स्पर्धक पाठवण्याचा मान हरयाणाला मिळाला आहे. टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत हरयाणातून एकूण ३१ खेळाडू, पंजाबमधून १९, तामिळनाडूतून ११, केरळमधून ८, उत्तर प्रदेशमधू ८, मणिपूर ५ खेळाडू सहभागी झाले होते. उत्तर प्रदेश देशातील सर्वाधिक लोकसंख्या असलेलं राज्य आहे. मात्र या राज्यातून ८ खेळाडूंची निवड झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
“तुमचं दुसरं घरं तुमची आतुरतेनं वाट पाहतंय”; मुख्यमंत्र्यांची हॉकी संघाला भावनिक साद
हरयाणातील सोनीपत जिल्ह्यातून सर्वाधिक खेळाडूंनी सहभाग घेतला आहे. यात सहा खेळाडू, चार हॉकीपटू, दोन कुस्तीपटूंचा समावेश आहे. त्यनंतर कुरुक्षेत्र आणि झज्जर या जिल्ह्यांचा क्रमांक येतो. हरयाणातील सोनीपत जिल्ह्यातील नहरी आणि नाहरा या दोन पंचायती कुस्तीपटूंच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध आहेत. २०१२ च्या लंडन ऑलिम्पिक स्पर्धेत सर्वात कमी वयात म्हणजेच १८ व्या वर्षी विक्रम अमित कुमार या कुस्तीपटूने सहभाग घेतला होता. आता टोक्यो फ्रिस्टाईल कुस्तीत रवि दहिया याने ५७ किलो वजनी गटात भाग घेत रौप्य पदक पटकावलं. रवि नहरी गावातील आहे. वुमन्स हॉकी संघात हरयाणातील ९ खेळाडूंचा समावेश आहे. तर ७ कुस्तीपटूंनी सहभाग घेतला होता.
भारत १९०० पासून ऑलिम्पिक स्पर्धेत भाग घेत आहे. ऑलिम्पिक स्पर्धा सर्वप्रथम १८९६ मध्ये ग्रीसच्या अॅथेंसमध्ये पार पडली होती. त्यानंतर भारताने १९०० साली पहिल्यांदा ऑलिम्पिक स्पर्धेत भाग घेतला होता. भारताने आतापर्यंत ऑलिम्पिक स्पर्धेत एकूण ९ सुवर्ण, ८ रजत आणि १५ कांस्य पदकं पटकावली आहेत. टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेपूर्वी भारतीय खेळाडूंनी १७ पदकं मिळवली आहेत. ११ राज्यातील खेळाडूंचा यात समावेश आहे. हरयाणातील सर्वात जास्त म्हणजे ४ खेळाडू आहेत. यात विजेंदर सिंह, सायना नेहवाल, योगेश्वर दत्त, साक्षी मलिक यांनी २००८ ऑलिम्पिकनंतर पदकं जिंकली आहेत. हरयाणानंतर पश्चिम बंगालच्या नावावर तीन ऑलिम्पिक पदकं आहे. तर दिल्लीच्या नावावर दोन ऑलिम्पिक पदकं आहेत. तर आठ राज्यातील स्पर्धकांनी प्रत्येकी एक पदक पटकावलं आहे.