भारताचा सध्याचा ट्वेन्टी-२० संघ समतोल असून, हा संघ जगाच्या पाठीवर कोणत्याही स्टेडियमवर सर्वोत्तम कामगिरी करेल, असा विश्वास संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने व्यक्त केला आहे. भारतीय संघाने ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये गेल्या १० सामन्यांपैकी ९ सामन्यांत विजयाची नोंद केली आहे. आशिया चषकातील अखेरच्या साखळी सामन्यात यूएईवर विजय मिळवल्यानंतर धोनी म्हणाला की, यंदाच्या वर्षात ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये आम्ही जो संघ उतरविला त्यातील समतोल पाहता हा संघ कुठल्याही वातावरणामध्ये कुठेही सर्वोत्तम कामगिरी करू शकतो. संघात सध्या तीन मुख्य वेगवान गोलंदाज आहेत. दोन फिरकीपटू आणि गरज पडल्यास कामचलाऊ गोलंदाज देखील संघात आहेत. फलंदाजीची बाजू पाहता अगदी आठव्या स्थानापर्यंत चांगली फलंदाजी करू शकतील असे खेळाडू आहेत. त्यामुळे हा संघ मला समतोल वाटतो, असेही धोनी पुढे म्हणाला.