इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल २०२२) स्पर्धा खेळल्यानंतर जवळपास अडीच महिन्यांच्या कालावधीनंतर भारतीय खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतले आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या पाच सामन्यांच्या टी ट्वेंटी मालिकेतून भारतीय संघाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. मात्र, या मालिकेत रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यासारख्या अनुभवी खेळाडूंना विश्रांती देण्यात आली. तर, केएल राहुलकडे संघाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. मात्र, दुखापतीमुळे ऐनवेळी ऋषभ पंतला कर्णधारपदाची संधी मिळाली. त्याच्या नेतृत्त्वाखालील पहिले दोन्ही सामने भारताने गमावले आहे. गेल्या सहा महिन्यांच्या काळात कर्णधारपदाच्या अदलाबदलीचा खेळ सुरू आहे.

२०२२ या वर्षामध्ये, भारतीय संघाने कसोटी, एकदिवसीय आणि टी ट्वेंटी असे एकूण १८ सामने खेळले आहेत. यादरम्यान विराट कोहली, रोहित शर्मा, केएल राहुल आणि ऋषभ पंत यांनी कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळली आहे. यापैकी रोहित वगळता इतर तिघांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.

वर्षाच्या सुरुवातीला भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना खेळला होता. या सामन्यात विराट कोहली दुखापतग्रस्त असल्यामुळे केएल राहुल कर्णधार होता. राहुलच्या नेतृत्त्वात संघाला सात गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. नंतरच्या सामन्यासाठी विराट कोहली संघात आला पण त्यालादेखील पराभवाला सामोरे जावे लागले. आफ्रिकेविरुद्घची ही मालिका संघाने २-१ अशी गमावली. त्यानंतर विराट कोहलीने कसोटी कर्णधारपदही सोडले.

हेही वाचा – IPL Media Rights Auction : आयपीएलचे टीव्ही आणि डिजिटल माध्यम हक्क दोन स्वतंत्र ब्रॉडकास्टर्सकडे, मिळाले ४४ हजार ७५ कोटी रुपये

जानेवारीमध्येच केएल राहुलने आफ्रिका दौऱ्यावर एकदिवसीय मालिकेत रोहित शर्माच्या अनुपस्थितीत भारतीय संघाची धुरा सांभाळली होती. तीन सामन्यांच्या या मालिकेत भारताचा ३-० असा पराभव झाला. त्यानंतर भारतीय संघ मायदेशी परतला. फेब्रुवारीमध्ये, एकदिवसीय आणि टी ट्वेंटीचे नेतृत्व रोहित शर्माकडे देण्यात आले. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन्ही मालिका जिंकल्या.

फेब्रुवारीच्या अखेरीस श्रीलंकेचा संघ तीन टी ट्वेंटी आणि दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी भारतात आला होता. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने अप्रतिम कामगिरी केली. या दोन्ही मालिकांमध्ये लंकेला व्हाईट वॉश मिळाला होता. एकूणच गेल्या सहा महिन्यांमध्ये भारतीय संघाला चार कर्णधार मिळाले. यश मात्र, एकालाच मिळाले.

Story img Loader