चेंगडू (चीन): गतविजेत्या भारताने इंग्लंडवर ५-० असा विजय मिळवत थॉमस चषक बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला. भारताने पहिल्या सामन्यात थायलंडला ४-१ अशा फरकाने नमवले होते.
एकेरीच्या सामन्यात एचएस प्रणॉयने हॅरी हुआंगला २१-१५, २१-१५ असे पराभूत करत भारताला चांगली सुरुवात करून दिली. ‘‘संघाला चांगली सुरुवात देणे हे नेहमीच महत्त्वाचे असते. यासह सामना योग्य पद्धतीने संपवणेही महत्त्वपूर्ण असते,’’ असे प्रणॉय म्हणाला. यानंतर भारताची तारांकित पुरुष दुहेरी जोडी सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी व चिराग शेट्टीने बेन लेन आणि सीन वेंडी जोडीला २१-१७, १९-२१, २१-१५ असे चुरशीच्या सामन्यात नमवले. सामन्यातील पहिला गेम जिंकत सात्त्विक व चिरागने चांगली सुरुवात केली. दुसऱ्या गेममध्ये इंग्लंडच्या जोडीने पुनरागमन करत लढत बरोबरीत आणली. मात्र, निर्णायक गेममध्ये भारतीय जोडीने कामगिरी उंचावताना गेमसह सामना जिंकला व संघाला २-० असे आघाडीवर पोहोचवले.
हेही वाचा >>>Mayank Yadav : लखनऊसाठी आनंदाची बातमी, ‘हा’ स्टार वेगवान गोलंदाज मुंबईविरुद्धच्या सामन्यापूर्वी झाला फिट
एकेरीच्या लढतीत किदम्बी श्रीकांतने नदीम दळवीला २१-१६, २१-११ असे सरळ गेममध्ये पराभूत करताना भारताला ३-० अशी भक्कम आघाडी मिळवून दिली. ‘‘स्पर्धेतील दोन्ही सामने माझ्या दृष्टीने चांगले झाले. सामना जिंकण्यासाठी खेळाडूवर दबाव असतो. यापुढील सामन्यांमध्ये माझे प्रतिस्पर्धी खेळाडू आणखी भक्कम असतील. त्यामुळे मला सर्वोत्तम कामगिरी करावी लागेल,’’ असे श्रीकांतने सांगितले. तर, एमआर अर्जुन व ध्रुव कपिला जोडीने रोरी ईस्टन व अॅलेक्स ग्रीन जोडीवर २१-१७, २१-१९ असा विजय मिळवला. अखेरच्या एकेरीच्या सामन्यात किरण जॉर्जने चोलान कायानला २१-१८, २१-१२ असे नमवत भारताला निर्भेळ यश मिळवून दिले. भारताचा सामना गटातील अखेरच्या लढतीत १४ जेतेपदे मिळवणाऱ्या इंडोनेशिया संघाशी होणार आहे.