महेंद्रसिंह धोनीवर टीका करणाऱ्या माजी क्रिकेटपटूंना टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी प्रत्युत्तर दिले आहे. दोन वेळा वर्ल्ड कप जिंकणाऱ्या माजी कर्णधारावर टीका करणाऱ्यांनी आधी स्वतःच्या करिअरकडे लक्ष द्यावे, असे शास्त्रींनी म्हटले आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत संथ खेळीमुळे महेंद्रसिंह धोनीवर टीका होत आहे. व्ही. व्ही. एस. लक्ष्मण आणि अजित आगरकर यांच्यासारख्या माजी खेळाडूंनी धोनीच्या टी-२० तील भवितव्यावरच प्रश्न उपस्थित केले होते. यामुळे भारताच्या क्रिकेटविश्वात नवा वाद निर्माण झाला. या वादात आता टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्री धोनीच्या बचावासाठी मैदानात उतरले आहेत. ‘धोनीवर टीका करण्यापूर्वी आधी लोकांनी स्वतःच्या करिअरकडे बघावे. धोनी अजूनही क्रिकेटमध्ये भरपूर योगदान देऊ शकतो. आता संघाने अशा दिग्गज खेळाडूच्या पाठिशी उभे राहण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले.
‘सध्या मैदानात धोनीपेक्षा सर्वोत्तम कोणीच नाही. विकेटमागे असो किंवा फलंदाजीत असो किंवा मैदानातील त्याची समयसूचकता आणि चाणाक्ष बुद्धी. या सर्व बाबतीत धोनी उजवा ठरतो, असे त्यांनी नमूद केले. भारतीय संघाच्या क्षेत्ररक्षणाचेही रवी शास्त्रींनी भरभरुन कौतुक केले. क्षेत्ररक्षणाच्या बाबतीत भारतीय संघ जगातील सर्वोत्तम संघ आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
कोलकाता येथील ईडन गार्डन स्टेडियममध्ये भारत – श्रीलंकेत पहिला कसोटी सामना रंगणार आहे. तीन कसोटी सामन्यांच्या या मालिकेवरही शास्त्रींनी भाष्य केले. ‘दक्षिण आफ्रिका दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर भारतासाठी ही मालिका महत्त्वाची आहे, या मालिकेत विजय मिळवण्याचा प्रयत्न आहे. हार्दिक पंड्याला मालिकेत विश्रांती दिल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आहे. यावर शास्त्रींना प्रश्न विचारण्यात आला. भारतीय संघ म्हणजे एखादा विशिष्ट खेळाडू नव्हे. सांघिक कामगिरीमुळेच विजय किंवा पराभव होतो, असे त्यांनी सांगितले.