India vs South Africa 1st Test Match: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सेंच्युरियनमध्ये खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटीत केएल राहुलने शतक झळकावून प्रत्येक चाहत्यांची मने जिंकली. टीम इंडियाला पहिल्या डावात केवळ २४५ धावा करता आल्या. त्यापैकी १०१ धावा एकट्या राहुलने केल्या. महान फलंदाज सुनील गावसकर यांच्यासह अनेक माजी क्रिकेटपटूंनी त्याच्या खेळीचे कौतुक केले आहे. त्याने आपल्या खेळीत १४ चौकार आणि ४ षटकार मारले. राहुलनेही षटकारासह आपले शतक पूर्ण केले.
सोशल मीडियावर के.एल. राहुलच्या खेळीचे चाहतेही कौतुक करत आहेत, मात्र काही महिन्यांपूर्वी तो दुखापतीमुळे टीम इंडियातून बाहेर असताना त्याच्यावर बरीच टीका होत होती. काही चाहत्यांनी त्याला संघातून कायमची हकालपट्टी करण्याची मागणीही सोशल मीडियावर केली होती. मात्र, आता राहुलने या सर्व टीकेला आधी बॅटने आणि नंतर स्वतःच्या भावना बोलून व्यक्त केल्या आहेत. त्याने सर्व टीकाकरांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. दुस-या दिवशी पत्रकार परिषदेत राहुल म्हणाला की, “आज जे लोक माझी स्तुती करत आहेत, तेच लोक काही महिन्यांपूर्वीपर्यंत शिव्या देत होते.”
आयपीएल २०२३ दरम्यान राहुल जखमी झाला होता. याआधीही त्यांच्यावर टीका झाली होती. कधी संथ खेळी आणि स्ट्राइक रेट बद्दल तर कधी खेळाकडे बघण्याच्या त्याच्या दृष्टिकोनाबद्दल. मात्र, राहुल याने यावर असे कोणतेही वक्तव्य केले नाही. माजी क्रिकेटपटू व्यंकटेश प्रसाद यांनी आपल्या ट्वीटमध्ये राहुलच्या निवडीवर वारंवार प्रश्न उपस्थित केले आहेत. या वर्षी मार्चमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत त्याला कसोटी उपकर्णधारपदावरून हटवण्यात आले होते.
दीर्घकाळ दुखापत झाल्यानंतर आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी केल्यानंतर राहुलला कसोटी संघात यष्टीरक्षक फलंदाजाची नवी भूमिका मिळाली आहे. यापूर्वी तो कसोटीत सलामीवीराची भूमिका बजावत होता. ३१ वर्षीय राहुलला या कसोटीत सहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवण्यात आले आणि त्याने शतक झळकावून स्वत:ला सिद्ध केले.
टीकाकारांची चोख उत्तर देत राहुल म्हणाला की, “या शतकातून मला काय मिळणार आहे आणि असे असूनही मी पुन्हा ट्रोलचा शिकार होणार आहे.” तो पुढे म्हणाला, “यातून मला काय मिळणार? लोकांना जे म्हणायचे आहे ते म्हणतील. तुम्ही जर पब्लिक परफॉर्मर असाल तर टीकेपासून दूर राहण्याचा एकमेव मार्ग म्हणजे सातत्याने कामगिरी करत राहणे.” राहुलने कबूल केले की सोशल मीडियावरील ट्रोलमुळे त्याच्यावर खूप परिणाम झाला, परंतु त्याने यावर कधीही प्रतिक्रिया दिली नाही.
लोकेश राहुल म्हणाला, “जे आज माझी स्तुती करत आहेत, ते काही महिन्यांपूर्वीपर्यंत मला शिव्या देत होते. सोशल मीडियावर होणाऱ्या शिवीगाळांमुळे मला त्रास होत नाही असे कोणी म्हणत असेल तर ते खोटे बोलत आहे. होय, हे खरे आहे की तुम्ही सोशल मीडियापासून जितके दूर राहाल तितके तुमच्या मानसिकतेसाठी चांगले असते.”
हेही वाचा: Smruti Mandhana: स्मृती मानधनाला जोडीदार म्हणून कसा पती हवा आहे? केबीसी मधील Video व्हायरल
राहुल पुढे म्हणाला, “जेव्हा तुम्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळता तेव्हा तुम्हाला केवळ एक खेळाडू म्हणून आव्हान दिले जात नाही, तर एक माणूस म्हणूनही तुमची परीक्षा घेतली जाते, कारण लोकांसमोर तुमची प्रतिमा असते. त्यामुळे जेव्हा मी खेळापासून दूर होतो तेव्हा मी मानवी दृष्टिकोनातून स्वतःवर काम केले. निश्चितच काही लोक होते ज्यांनी मला खूप मदत केली. खराब कामगिरीसाठी ट्रोल होणे सामान्य आहे, पण त्याचा परिणाम होत नाही असे म्हणणे चुकीचे ठरेल. मी पुन्हा जो आहे तसा बनण्याचा प्रयत्न करत आहे. दुखापतीच्या काळात खेळापासून दूर असताना मी या टीकेचा प्रभाव कसा होऊ नये आणि स्वत:ला कसे बदलता येईल यावर काम केले. इतकं काही घडल्यानंतर स्वत:शी आणि तुमच्या व्यक्तिमत्त्वाशी प्रामाणिक राहणं कठीण आहे. ही सर्वात कठीण गोष्ट आहे.”
के. एल. शेवटी म्हणाला, “तुमचे स्वतःचे व्यक्तिमत्त्व, वैशिष्ट्ये वेगळी आहेत. जेव्हा तुम्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळता तेव्हा त्यांना आव्हान मिळते. याचा परिणाम प्रत्येक खेळाडूवर होतो आणि जो कोणी म्हणतो त्याचा त्यांच्यावर अजिबात परिणाम होत नाही, मला खात्री आहे की ते खोटे बोलत आहे. तुमच्या मर्यादा काय आहेत हे तुम्हाला माहीत असल्यास तुम्ही कामगिरी करू शकता किंवा चांगल्या मानसिकतेत असू शकता. कोणीही इतका महान नाही की तो जे बोलले जात आहे आणि त्याच्यावर होत असलेल्या टीकेपासून पूर्णपणे सुटू शकेल.”