वरिष्ठ राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी बारामतीत चालू असलेल्या विशेष सराव शिबिरातील महाराष्ट्राच्या संभाव्य चमूमधील तीन कबड्डीपटूंना करोनाची लागण झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळते आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अयोध्या (उत्तर प्रदेश) येथे १३ ते १७ एप्रिल या कालावधीत होणाऱ्या वरिष्ठ राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी १५ संभाव्य खेळाडूंचे शिबीर बारामतीत प्रशिक्षक प्रशांत सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होते. करोना साथीच्या पार्श्वभूमीवर यंदा राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेला काटशह देऊन महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेने मैदानी निवड चाचणी प्रक्रिया राबवली होती. १२ एप्रिलला दुपारी विमानाने महाराष्ट्राचा संघ उत्तर प्रदेशकडे रवाना होणार होता. त्यानुसार शिबिरार्थींच्या बुधवारी करोना चाचण्या घेण्यात आल्या. यापैकी संरक्षण फळीची भिस्त असलेल्या तीन खेळाडूंच्या चाचणीचा अहवाल सकारात्मक आल्यामुळे संघटनेचे धाबे दणाणले आहेत. त्यामुळे गुरुवारी बारामतीमधील शिबीर संपवून सर्व खेळाडू आणि मार्गदर्शक आपापल्या घरी परतले आहेत, अशी माहिती सूत्रांकडून मिळते आहे.

संघनिवडीचा मार्ग मोकळा की पेच?

राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघातील १२ जणांची नावे ऑनलाइन नोंदवण्याची मुदत १० एप्रिलला संपणार आहे. या पार्श्वभूमीवर १५ संभाव्य खेळाडूंपैकी करोनाबाधित तिघांची नावे वगळल्यास निवड समितीचे काम सोपे होईल. परंतु करोना चाचणीचा अहवाल सकारात्मक आलेल्या खेळाडूंना कोणतीही लक्षणे नाहीत. त्यामुळे या तिघांनीही घरी परतल्यावर पुन्हा आपल्या चाचण्या केल्याची माहिती मिळते आहे. या तिघांचा दुसरा चाचणी अहवाल नकारात्मक आल्यास त्यांच्याबाबत कोणता निकष लावला जाणार, याविषयी मात्र राज्याच्या कबड्डी क्षेत्रात उत्सुकता निर्माण झाली आहे.

भारतीय रेल्वेचा संघ जाहीर

मुंबई : वरिष्ठ राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी पवन कुमारच्या नेतृत्वाखाली भारतीय रेल्वेचा संघ जाहीर करण्यात आला असून, यात अनेक मातब्बर खेळाडूंचा समावेश आहे. या संघात महाराष्ट्रातील श्रीकांत जाधव या एकमेव खेळाडूला स्थान मिळवता आले आहे. रेल्वेचा संघ : धरमराज चेरलाथन, पवन कुमार, सुनील, परवेश भन्सल, पी. मल्लिकार्जुन, रोहित गुलिया, संदीप कुमार, नितीन रावल, श्रीकांत जाधव, रवी कुमार, विकाश खंडोला, रविंदर पहेल. प्रशिक्षक : संजीव कुमार, राणाप्रताप तिवारी, मंदार शेट्टी. व्यवस्थापक : शिव नारायण

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Three kabaddi players from maharashtra contracted coronavirus abn