पाकिस्तानच्या महिला क्रिकेट संघाच्या अडचणीत अजून वाढ झाली आहे. संघातील अजून ३ क्रिकेटपटू करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे एकूण संक्रमित खेळाडूंची संख्या ६ झाली आहे. या घटनेमुळे वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी मजबूत संघ खेळवण्याबाबत पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) साशंक आहे. आधी संक्रमित झालेले खेळाडू कराची येथे उभारण्यात आलेल्या शिबिरात आधीच क्वारंटाइनमध्ये आहेत.
न्यूज १८ हिंदीच्या वृत्तानुसार, पीसीबीच्या अधिकाऱ्याने सांगितले की, या मालिकेसाठी निवडलेल्या १८ खेळाडूंपैकी १२ खेळाडू सध्या नॅशनल स्टेडियममध्ये प्रशिक्षण घेत आहेत. स्टेफनी टेलरच्या नेतृत्वाखाली वेस्ट इंडिजचा महिला संघ कराचीला पोहोचला आहे. शुक्रवारपासून त्यांचे प्रशिक्षण सुरू होणार आहे.
हेही वाचा – VIDEO : ‘‘हा चौकार तुझ्या…”, स्कॉटलंडच्या फलंदाजानं वटारले डोळे; मग भडकलेल्या ट्रेंट बोल्टनं….
दोन्ही संघ ८ ते १४ नोव्हेंबर दरम्यान तीन एकदिवसीय सामने खेळणार आहेत. कराचीतील नॅशनल स्टेडियमवर सामने खेळवले जातील. यापूर्वी पाकिस्तानने वेस्ट इंडिजमध्ये तीन टी-२० आणि पाच एकदिवसीय सामने खेळले होते. पाकिस्तानचा पुरुष संघ टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी यूएईमध्ये आहे.