भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ९ फेब्रुवारीपासून बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी (BGT) सुरू होत आहे. दोन्ही संघ चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत भिडणार आहेत. पहिली कसोटी नागपूरच्या विदर्भ क्रिकेट स्टेडियमवर खेळवली जाणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ आणि पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियन संघ तयारीत व्यस्त आहे. दोन्ही संघामध्ये नेहमीच चुरुस पाहिला मिळते, ज्यामुळे वादही झाले आहे. ज्याबद्दल आपण आज जाणून घेऊया.
होमवर्कगेट –
२०१२-१३ मध्ये भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाला ४-० ने पराभवाचा सामना करावा लागला. हैदराबादच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या मालिकेतील दुसरा सामना ऑस्ट्रेलियाने चार दिवसांत गमावला. सामना गमावल्यानंतर, ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक मिकी आर्थर यांनी कांगारू खेळाडूंना तीन गोष्टींची यादी सादर करण्यास सांगितले, ज्यावर ते सुधारू शकतात. शेन वॉटसन, मिचेल जॉन्सन, उस्मान ख्वाजा आणि जेम्स पॅटिनसन वगळता सर्व खेळाडूंनी यादी सादर केली.
चार खेळाडूंनी प्रशिक्षकाच्या आदेशाचे उल्लंघन केले, त्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले. म्हणजेच ते पुढील कसोटीत खेळण्यास पात्र नव्हते. मीडियाने या प्रकरणाला ‘होमवर्कगेट’ असे नाव दिले. या प्रकरणावरून ऑस्ट्रेलियन क्रिकेट विश्वात मोठा गदारोळ झाला होता. मात्र, वॉटसनने चौथ्या कसोटीत पुनरागमन केले आणि मायकेल क्लार्कच्या उपस्थितीत संघाची जबाबदारी स्वीकारली. ऑस्ट्रेलियाच्या पुढील मालिकेपूर्वी आर्थरला वगळण्यात आले. त्यांच्या जागी डॅरेन लेहमन प्रशिक्षक बनले.
मंकीगेट वाद –
भारत आणि ऑस्ट्रेलियातील क्रिकेट चाहत्यांमध्ये ‘मंकीगेट’ प्रकरणाची चर्चा आहे. २००७-०८ मध्ये सिडनी कसोटीदरम्यान भारताचा हरभजन सिंग आणि ऑस्ट्रेलियाचा अँड्र्यू सायमंड्स यांच्यात भांडण झाले होते. त्यानंतर सायमंड्सने वांशिक टिप्पणी केल्याचा आरोप केला. सायमंड्सने सांगितले की, हरभजनने त्याला ‘माकड’ म्हटले. तर हरभजनने हे आरोप फेटाळून लावले. हा वाद इतका तापला की भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौरा सोडून परतणार असल्याची चर्चा होती. मात्र, भारताचा दौरा सुरूच राहिला. कारण या वादात सचिन तेंडुलकरने महत्त्वाची साक्ष दिली, त्यानंतर प्रकरणाला पूर्णविराम मिळाला.
खेळपट्टीशी छेडछाड –
ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू स्टीव्ह स्मिथने २०२०-२१ मालिकेत खेळपट्टीवरी खुणाशी छेडछाड केल्याच्या कृत्यावरुन बराच वाद झाला होता. खरेतर, सिडनी कसोटीच्या पाचव्या दिवशी स्मिथने ऋषभ पंतच्या खेळपट्टीवर केलेल्या खुणा पुसून टाकण्याचा प्रयत्न केला. त्याचे हे कृत्य कॅमेऱ्यात कैद झाले. व्हिडिओमध्ये ड्रिक्स ब्रेक दरम्यान स्मिथने खुणा मिटवल्याचे दिसले. त्याचवेळी स्मिथने यावर प्रतिक्रिया देत काही गोष्टी समजून घेण्यासाठी आणि सराव करण्यासाठी हे करत असल्याचं सांगितलं. तो म्हणाला, “आम्ही कुठे गोलंदाजी करत आहोत आणि फलंदाज त्याचा कसा सामना करत आहेत, हे समजून घेण्यासाठी मी अनेकदा सामन्यांमध्ये असे करतो. मला तिथे खुणा करण्याची सवय आहे.”