T Murugesan win Silver and Manisha Ramdas Bronze in Badminton Paralympics 2024 : पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ स्पर्धेच्या पाचव्या दिवशी रात्री भारताने १० मिनिटांत २ पदके जिंकली आहेत. एकीकडे तुलसीमती मुरुगेसनला बॅडमिंटनमध्ये रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. तिला महिला एकेरीच्या SU5 प्रकारातील अंतिम फेरीत चीनच्या यांग क्विक्सिया हिच्याकडून २१-१७, २१-१० असा पराभव स्वीकारावा लागला. दुसरीकडे याच गटात मनीषा रामदासने डेन्मार्कच्या कॅथरीनचा २१-१२, २१-८ असा सहज पराभव केला.
विशेष म्हणजे पहिल्या फेरीच्या सामन्यापासून उपांत्य फेरीपर्यंत मुरुगेसनने एकही सेट गमावला नव्हता. आतापर्यंत तिने आपल्या तिन्ही प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व राखत अंतिम फेरी गाठली होती. मात्र विजेतेपदाच्या लढतीत तिला चीनच्या खेळाडूने २१-१७, २१-१० अशा सरळ सेटमध्ये पराभूत केले. दुसरीकडे, मनीषाने आपला शानदार प्रवास सुरू ठेवत एकतर्फी विजय नोंदवत भारताला कांस्यपदक मिळवून दिले.
मनीषाने संपूर्ण सामन्यात दबदबा कायम राखला –
१९ वर्षीय मनीषाला रोसेन्ग्रेनला पराभूत करण्यासाठी केवळ २५ मिनिटे लागली. मनीषाने संपूर्ण सामन्यात आपला दबदबा कायम राखला आणि विरोधी खेळाडूला एकही संधी दिली नाही. तिने पहिल्या सेटमध्येच आघाडी घेतली आणि १३ मिनिटांत सेट जिंकला. यानंतर १२ मिनिटांत दुसरा सेट जिंकून कांस्यपदक मिळवण्यात तिला यश आले. यासह पॅरालिम्पिकमध्ये बॅडमिंटन स्पर्धेत पदक जिंकणारी मनीषा पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली. मात्र, लवकरच मुरुगेसनचाही या यादीत समावेश झाला. उपांत्य फेरीत मनीषाचा मुरुगेसनकडून पराभव झाला.
मुरुगेसनला शेवटपर्यंत चांगली सुरुवात राखता आली नाही –
पॅरालिम्पिकमध्ये बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणारी मुरुगेसन ही पहिली भारतीय महिला आहे. अंतिम फेरीत मुरुगेसनने चीनच्या खेळाडूला चांगले आव्हान दिले आणि लवकरच गुणसंख्या ४-४ अशी बरोबरीत आणली. एका क्षणी मुरुगेसनने दोन गुणांची आघाडीही घेतली होती, पण ही आघाडी तोडण्यात किउ जियाला यश आले. त्यानंतर चीनच्या खेळाडूने मुरुगेसनसमोर कडवे आव्हान उभे केले आणि सामना जिंकण्यास जास्त वेळ लागला नाही.
भारताने बॅडमिंटनमध्ये एका दिवसात तीन पदके जिंकली –
भारताच्या पदकांची संख्या आता ११वर पोहोचली आहे. तलसीमती मुरुगेसन आणि मनीषा रामदास यांच्या अगोद नितीश कुमारने बॅडमिंटनच्या पुरुष एकेरी SL3 प्रकारात भारतासाठी सुवर्णपदक जिंकले होते. नितीश कुमारने पुरुष एकेरी SL 3 गटाच्या अंतिम फेरीत ग्रेट ब्रिटनच्या डॅनियल बॅटलीचा २१-१४, १८-२१, २३-२१असा पराभव करून सुवर्णपदक जिंकले होते. पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ मध्ये भारताचे हे एकूण दुसरे सुवर्णपदक होते.