काही महिन्यांपूर्वी ओडीशा राज्याला फॅनी चक्रीवादळाने झोडपून काढलं होतं. या नैसर्गिक आपत्तीमध्ये मोठ्या प्रमाणात वित्तहानी आणि जिवीतहानी झाली होती. मात्र मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी प्रशासकीय यंत्रणेला हाताशी धरुर, मोठ्या प्रमाणात जनतेला सुरक्षित स्थळी स्थलातंर केलं. सरकारने उचललेल्या या पावलामुळे मोठ्या प्रमाणात होऊ शकत असलेली जिवीतहानी टळली. यानंतर केंद्र सरकारसह सर्व जगभरातून ओडीशा सरकारवर कौतुकाचा वर्षाव करण्यात आला.

६ जूनपासून भुवनेश्वर शहरात FIH Men’s Series Final या मानाच्या हॉकी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. भारतीय हॉकी संघासाठी २०२० साली टोकियो ऑलिम्पिकमध्ये पात्र होण्याकरता ही स्पर्धा महत्वाची मानली जात आहे. चक्रीवादळामुळे ही स्पर्धा होणार की नाही असं प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. मात्र ओडीशा सरकारने स्पर्धेच्या आयोजनाबद्दल सकारात्मकता दाखवली. त्यामुळे स्पर्धेचं आयोजन करणाऱ्या हॉकी इंडियानेही तिकीटविक्रीमधून मिळणारी रक्कम ही मुख्यमंत्री सहायता निधीला दान करण्याचा निर्णय घेतला आहे.

हॉकी इंडियाने प्रसिद्धीपत्रक काढून यासंदर्भात माहिती दिली आहे. “फॅनी चक्रीवादळामुळे ओडीशातील नागरिकांवर संकट आलं, आम्ही सदैव त्यांच्यासोबत आहोत. ओडीशाने नेहमी हॉकी खेळावर प्रेम केलं आहे. त्यामुळे तिकीटविक्रीतून जमा होणारा निधी आम्ही मुख्यमंत्री सहायता निधीला दान करण्याचा निर्णय घेतला आहे.” हॉकी इंडियाचे अध्यक्ष मोहम्मद मुश्ताक अहमद यांनी माहिती दिली. याआधीही भुवनेश्वर शहरात हॉकी विश्वचषकाचं आयोजन करण्यात आलं होतं. याचसोबत ओडीशा सरकार हे भारतीय हॉकी संघाचे मुख्य प्रायोजक आहेत.

Story img Loader