Tilak Varma Century in Syed Mushtaq Ali Trophy: सध्या भारतातील सर्वात मोठी टी-२० स्पर्धा खेळवली जात आहे. या स्पर्धेत हैदराबाद विरूद्ध मेघालय सामन्यात तिलक वर्माने पुन्हा एकदी शतकी कामगिरी केली आहे. आज म्हणजेच २३ नोव्हेंबरला खेळल्या गेलेल्या सामन्यात तिलक वर्माने इतिहास घडवला आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये मेघालयविरुद्ध फलंदाजी करताना त्याने शतक झळकावले. तिलकने ६७ चेंडूत २ चौकार आणि १ षटकारासह १५१ धावांची खेळी केली.
तिलक वर्माने मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये १५१ धावा करत सर्वात मोठ्या धावसंख्येचे खेळी केली. टी-२० मध्ये तिलक वर्माचे हे सलग तिसरे शतक आहे. याआधी तिलक वर्माने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेतील शेवटच्या दोन सामन्यात शतकं झळकावली होती. यासह, तो टी-२० क्रिकेटमध्ये सलग तीन शतके झळकावणारा जगातील पहिला फलंदाज ठरला.
तसेच तिलक वर्मा हा सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या इतिहासात आणि टी-२० क्रिकेटमध्ये १५० हून अधिक धावा करणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला. त्याने श्रेयस अय्यरला (१४७ धावा) मागे टाकले. हैदराबादचा कर्णधार असलेला तिलक वर्माने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात मेघालयविरुद्ध अवघ्या ५१ चेंडूत शतक पूर्ण केले. १० दिवसांत तिसऱ्यांदा त्याने टी-२० क्रिकेटमध्ये १०० चा आकडा पार केला. या सामन्यात तिलक वर्मा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. त्याने २८ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले.
योगायोगाने, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतच, तिलक वर्मा टीम इंडियाच्या संजू सॅमसननंतर सलग २ टी-२० शतकं करणारा दुसरा फलंदाज ठरला होता. तिलक वर्माच्या शतकाच्या जोरावर या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने २० षटकांत ४ गडी गमावून २४८ धावा केल्या. ज्यात तिलकने १५१ धावांचे योगदान दिले. तिलकशिवाय तन्मय अग्रवालने २३ चेंडूत ५५ धावांची खेळी केली. तन्मयने आपल्या खेळीत ४ चौकार आणि ५ षटकार मारले. आता हैदराबादचा संघ या सामन्यात मजबूत स्थितीत असल्याचे दिसून येत आहे.