IND vs SA Tilak Verma Maiden T20I Century Celebration: तिलक वर्माने दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात पहिले आंतरराष्ट्रीय शतक झळकावत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. तिलक वर्माने ५६ चेंडूत ८ चौकार आणि ७ षटकारांसह नाबाद १०७ धावा केल्या. या शतकाच्या जोरावर भारताने २०० अधिक धावांचा टप्पा गाठला. तिलक वर्मा तिसऱ्या टी-२० सामन्यात कर्णधार सूर्यकुमार यादवच्या जागी म्हणजेच तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरला होता. या क्रमांकावर फलंदाजीला उतरत त्याने शानदार शतक केले. पण शतक झाल्यानंतर तिलकने कोणाला फ्लाईंग किस दिली, सामन्यानंतर तिलकने त्याच्या सेलिब्रेशनचा खुलासा केला.
दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा झाली तेव्हा तिलक वर्माला संघात संधी मिळाली नव्हती, याची जोरदार चर्चा होती. पण नंतर नशीबाने तिलक वर्माला या टी-२० मालिकेसाठी संधी मिळाली. शिवम दुबेच्या दुखापतीमुळे तिलक वर्माला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेत सामील करण्यात आलं. तिलक वर्माला टी-२० संघात आपले स्थान कायम ठेवण्यासाठी ही त्याच्यासाठी एक सुवर्णसंधी होती. या संधीचा फायदा घेत त्याने पहिले टी-२० शतक झळकावले होते. यासह तो भारतासाठी या फॉरमॅटमध्ये शतक झळकावणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. या बाबतीत त्याने पाकिस्तानच्या अहमद शहजादला मागे टाकले आहे.
तिलक वर्माने या शतकानंतर सेलिब्रेशन करताना बॅट दाखवून फ्लाईंग किस देत अनोखं सेलिब्रेशन केलं. तिलक वर्माने ही फ्लाईंग किस कर्णधार सूर्यकुमार यादवला दिली होती. याबद्दल तिलकने स्वत: या खेळीनंतर याचा खुलासा केला आहे. सामनावीराचा पुरस्कार मिळाल्यानंतर तिलक म्हणाला, “मी हे शब्दात स्पष्ट करू शकत नाही. देशासाठी खेळणे हे माझे स्वप्न होते आणि संघाला त्यावेळी शतकाची फार गरज होती. याचे सर्व श्रेय कर्णधार सूर्यकुमार यादवला जाते. त्याने (सूर्यकुमार यादव) मला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीची संधी दिली आणि मला दिलखुलासपणे खेळण्यास सांगितले. त्याचे पुन्हा एकदा आभार.”
भारताच्या विजयानंतर बोलताना सूर्यकुमार यादव तिलक वर्माबद्दल म्हणाला, “तिलक वर्मा आम्ही गकेबेहरामध्ये असताना माझ्या खोलीत आला आणि म्हणाला, मला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची संधी मिळेल का, मी चांगली कामगिरी करून दाखवेन आणि हे ऐकून मी त्याला म्हणालो ठीक आहे. त्याने एक संधी मागितली आणि त्या संधीचं सोनं करून दाखवलं. त्याच्यासाठी आणि त्याच्या कुटुंबासाठी मी खूप आनंदी आहे.”
तिलक वर्माला शतकानंतरच्या सेलिब्रेशनबाबत विचारलं तेव्हा म्हणाला, “ते सेलिब्रेशन सूर्यासाठी, आमच्या कर्णधारासाठी होतं. त्याने मला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची संधी दिली. आदल्या दिवशी रात्री माझ्या खोलीत येऊन त्याने मला सांगितलं, ठीक आहे तू तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी कर, तुझ्यासाठी ही चांगली संधी आहे आणि चांगली कामगिरी कर. मी त्याला म्हणालो, मी चांगली कामगिरी करेन आणि मैदानावर दाखवून देईन. त्यामुळे मी शतकानंतर त्याच्याकडे बॅट दाखवली.”
© IE Online Media Services (P) Ltd