Tilak Verma’s Second Consecutive Century in Ranji Trophy : रणजी करंडक स्पर्धेच्या या मोसमात हैदराबाद संघाचे कर्णधारपद भूषवणारा तिलक वर्मा सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. या मोसमात सिक्कीमविरुद्ध त्याने पुन्हा एकदा शतक झळकावले. दुसरीकडे, आज हरियाणाचा फलंदाज हिमांशू राणाने मणिपूरविरुद्ध नाबाद द्विशतक झळकावले, तर केरळचा सलामीवीर एन जगदीसन यानेही रेल्वेविरुद्ध द्विशतक झळकावून अप्रतिम कामगिरी केली.
तिलक वर्माची शतकी खेळी –
सिक्कीमविरुद्धच्या सामन्यात हजेरी लावण्यापूर्वी तिलक वर्मा अफगाणिस्तानविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी टीम इंडियाचा भाग होता. या मालिकेत त्याला एक सामना (पहिला सामना) खेळण्याची संधी मिळाली आणि त्याने २६ धावांची खेळी केली होती. त्यानंतर विराट कोहलीच्या पुनरागमनानंतर त्याला प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात आले.
ही मालिका संपल्यानंतर तिलक वर्मा पुन्हा एकदा रणजी खेळण्यासाठी आला. त्याने सिक्कीमविरुद्ध १११ चेंडूंचा सामना करत ४ षटकार आणि ८ चौकारांच्या मदतीने १०३ धावांची नाबाद खेळी केली. या संघाचा सलामीवीर फलंदाज तन्मय अग्रवालने १२५ चेंडूत ५ षटकार आणि ११ चौकारांच्या मदतीने १३७ धावा केल्या. या दोघांच्या शतकी खेळीच्या जोरावर हैदराबादने पहिल्या डावात ४ बाद ४६३ धावा करून डाव घोषित केला. याआधी या मोसमात तिलक वर्माने नागालँडविरुद्ध नाबाद १०० धावांची खेळी केली होती.
हेही वाचा – Sana Javed : कोण आहे उमैर जसवाल? शोएब मलिकच्या तिसऱ्या लग्नानंतर त्याचे नाव का चर्चेत, जाणून घ्या
हिमांशू राणाने साकारली २५० धावांची नाबाद खेळी –
हरियाणाचा फलंदाज हिमांशू राणाने ३१३ चेंडूंचा सामना करत मणिपूरविरुद्ध ३३ चौकारांच्या मदतीने २५० धावांची नाबाद खेळी साकारली. त्याच्या या खेळीच्या जोरावर हरियाणाने पहिल्या डावात ३ बाद ५०८ धावा करून डाव घोषित केला. हरियाणाकडून निशांत सिंधूनेही १८ चौकारांच्या मदतीने ११९ धावांची खेळी केली.
हेही वाचा – Mohammed Shami : “लग्न करणार आहेस का?” मोहम्मद शमीच्या व्हायरल फोटोमुळे चाहत्यांना पडला प्रश्न
एन जगदीसननेही झळकावले द्विशतक –
या मोसमात, केरळचा फलंदाज एन जगदीसननेही पहिल्या डावात रेल्वेविरुद्ध द्विशतक झळकावले. वृत्त लिहिपर्यंत तो क्रीजवर उपस्थित होता. जगदीसनने ३४४ चेंडूंचा सामना करत ४ षटकार आणि ११ चौकारांच्या मदतीने २०८ धावा केल्या. त्याच्या या खेळीच्या बळावर केरळ संघाने ७ विकेट गमावत ४१६ धावा केल्या.