Tilak Verma shares his debut experience with Ishan Kishan: मुंबई इंडियन्सचा युवा फलंदाज तिलक वर्माने प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर टीम इंडियात पदार्पण करण्याची संधी मिळाली. वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात त्याने पदार्पण केले. पहिल्या टी-२० मध्ये भारताचा पराभव झाला असला, तरी या सामन्यात तिलक वर्माने संघाकडून सर्वाधिक धावा केल्या होत्या. तिलक वर्माने आपल्या छोट्या पण चमकदार खेळीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या सामन्यानंतर तिलक वर्माने आपल्या पदार्पणाचा खास अनुभव इशान किशनसोबत शेअर केला.
इशान किशनने संवादादरम्यान तिलक वर्माला विचारले की, पदार्पणानंतर त्यांचा अवतार इतका का बदलला आहे. तिलक वर्माने हातावर टॅटू बनवले आहेत. त्याच्या छातीवरही एक टॅटू आहे. तिलक वर्माने सांगितले की, ही त्यांची बालपणीची इच्छा होती, जी आता पूर्ण झाली आहे. इशान किशन आणि तिलक वर्माच्या या संवादाचा व्हिडीओ बीसीसीआयने शेअर केला आहे.
तिलक वर्माने सांगितले या बदलाचे कारण –
इशान किशनने तिलक वर्माला प्रश्न विचारला की, “तू अचानक एवढा कसा काय बदललास, तुझ्या हातावर टॅटू आहे, पायावर टॅटू आहे, छातीवर टॅटू आहे. जनतेला याचे उत्तरे हवे आहे.” यावर तिलक वर्मा उत्तर देताना म्हणाला, ”हे आधीच ठरलं होतं. हे अचानक घडलं नाही. मला लहानपणापासून हे करायचे होते. मी कोचला विचारले होते, तेव्हा त्यांनी त्यांनी या सर्व गोष्टींना परवानगी दिली नाही. ते म्हणाले की, हे सर्व तू चांगल्या पातळीवर पोहोचल्यावर करायचे.”
तिलक वर्माने आनंदाची बातमी पहिल्यांदा कोणाला सांगितली –
तिलक वर्माने त्याच्या पदार्पणाची कहाणी आणि त्याला ही आनंदाची बातमी कशी मिळाली, हे सांगितले. वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा झाली, तेव्हा तिलक देवधर ट्रॉफीमध्ये खेळत होता. त्याने प्रथम त्याच्या कुटुंबीयांना आणि प्रशिक्षकाला कॉल करुन कळवले. तिलकचे आई-वडील फोनवर रडायला लागले होते. त्यामुळे तिलक फार वेळ बोलू शकला नाही. यावर इशान किशन म्हणतो की, जेव्हा त्याने पदार्पण केले, तेव्हा त्याच्या कुटुंबाचीही अशीच अवस्था होती.