Tilak Verma’s Celebration Video Goes Viral: विजेतेपदाचा प्रबळ दावेदार असलेल्या भारताने शुक्रवारी उपांत्य फेरीत बांगलादेशचा नऊ गडी राखून पराभव केला. त्याचबरोबर पुरुष क्रिकेटच्या अंतिम फेरीत स्थान निश्चित करून पदक निश्चित केले. भारताचा युवा फलंदाज तिलक वर्माने येथे २६ चेंडूत अर्धशतक झळकावले. तिलकने आपले अर्धशतक खास पद्धतीने साजरे केले. ज्याचा व्हिडीओ सोशल माडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तसेच सामन्यानंतर तिलक वर्माने आपल्या या खास सेलिब्रेशनचे कारणही सांगितले.
तिलक वर्माने झळकावले अर्धशतक –
तिलक वर्मासाठी मागील काही सामने चांगले राहिले नव्हते त्यामुळे त्यांची निराशा झाली होती. शुक्रवारी त्याच्या अर्धशतकाने त्याचा आत्मविश्वास परत आला. ५० धावा पूर्ण करताच त्याने आपली जर्सीवर आपल्या कंबरेवर असलेला टॅटू कॅमेऱ्याला दाखवला. यानंतर आकाशाकडे पाहिले आणि हात जोडले. त्याच्या या खास सेलिब्रेशनचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
सेलिब्रेशनबद्दल तिलक वर्माने केला खुलासा –
सामना संपल्यानंतर तिलकला या सेलिब्रेशनचे कारण विचारले असता तो म्हणाला, ‘ते सेलिब्रेशन माझ्या आई-वडिलांसाठी होते. शेवटचे काही सामने चांगले गेले नव्हते. त्यामुळे मला थोडे निराश वाटत होते. पुढच्या सामन्यात मी अर्धशतक झळकावेन, असे वचन मी त्यांना दिले होते. तो टॅटू माझ्या आई-वडिलांचा आहे. या सेलिब्रेशनमध्ये मी माझ्या बेस्ट फ्रेंड सॅमीचाही समावेश केला आहे.’ सॅमी हे भारतीय कर्णधार रोहित शर्माच्या मुलीचे नाव आहे. ती तिलक वर्माची खास फ्रेंड आहे. यापूर्वी जेव्हा तिलक वर्माने अर्धशतक झळकावले होते, तेव्हा त्याने सॅमीसाठी सेलिब्रेशन केले होते.
हेही वाचा – Asian Games: टीम इंडियाने बांगलादेशवर ९ विकेट्सने मात करत फायनलमध्ये मारली धडक, ऋतुराज-तिलकची शानदार खेळी
या सामन्यात प्रथम फलंदाजी करतान बांगलादेशचा डालव ९६ धावांवर आटोपला. तसेच ९७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खूपच खराब झाली. गेल्या सामन्यात शतक झळकावणारा यशस्वी जैस्वाल खाते न उघडता बाद झाला. मात्र, यानंतर तिलक वर्मा आणि ऋतुराज गायकवाड यांनी स्फोटक शैलीत धावा केल्या. चौथ्या षटकातच भारताची धावसंख्या ५० धावांपर्यंत पोहोचली. तिलकने नवव्या षटकात आपले अर्धशतक पूर्ण केले आणि टीम इंडिया विजयाच्या उंबरठ्यावर होती. भारताने ९.२ षटकात एक विकेट गमावून ९७ धावा केल्या आणि सामना जिंकला. तिलक वर्मा २६ चेंडूत ५५ धावा आणि ऋतुराज गायकवाड २६ चेंडूत ४० धावा करून नाबाद राहिले. बांगलादेशकडून रिपन मोंडलने एकमेव विकेट घेतली.