गेल्या काही दिवसांत भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याच्या संघातील स्थानावर अनेक चर्चांना उधाण आलं होतं. वयोपरत्वे धोनीचा थंडावत चाललेला खेळ पाहता, त्याने वन-डे क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची मागणी अनेक माजी खेळाडूंनी केली होती. मात्र भारतीय संघाचे निवडसमिती प्रमुख एम. एस. के. प्रसाद यांनी २०१९ विश्वचषकापर्यंत महेंद्रसिंह धोनी भारतीय संघात यष्टीरक्षक म्हणून काम करेल असं स्पष्ट केलंय. पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत प्रसाद यांनी हे संकेत दिले आहेत.
अवश्य वाचा – …म्हणून युवराज आणि रैनाला संघात जागा नाही – एम. एस. के. प्रसाद
“सध्या आम्ही काही तरुण यष्टीरक्षकांना संधी देतोय. भारत ‘अ’ संघाकडून जास्तीत जास्त तरुण खेळाडू समोर येतील अशी आम्हाला आशा आहे. मात्र २०१९ पर्यंत महेंद्रसिंह धोनी हाच भारतीय संघात यष्टीरक्षक म्हणून कायम राहिलं.” विश्वचषकापर्यंत निवड समिती कोणतेही नवीन प्रयोग करण्याच्या तयारीत नसल्याचे संकेतच यावेळी प्रसाद यांनी दिले.
गेल्या काही सामन्यांमध्ये धोनीने यष्टीरक्षक म्हणून केलेली कामगिरी आपण सर्वांनी पाहिलेली आहे. सध्याच्या घडीला धोनीच्या तोडीचा एकही यष्टीरक्षक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सापडणार नाही. श्रीलंकेविरुद्ध मालिकेत धोनीने घेतलेले काही झेल आणि स्टम्पिंग हे खरचं दाद देण्यासारखे होते, धोनीच्या खेळाचं कौतुक करताना प्रसाद पीटीआयशी बोलत होते. मध्यंतरीच्या काळात ऋषभ पंत किंवा संजू सॅमसन या तरुण खेळाडूंना संघात जागा देण्याची मागणी केली जात होती. मात्र या दोनही खेळाडूंना आपल्या खेळात आणखी बदल करावा लागणार आहे. त्यामुळे आगामी काळात पंत किंवा सॅमसन यांना संघात जागा मिळण्याची शक्यता कमी असल्याचं म्हणलं जातंय.
अवश्य वाचा – आफ्रिका दौऱ्यासाठी भारताच्या वन-डे संघाची घोषणा, युवराज-रैनाला संघात जागा नाहीच