मेलबर्न कसोटीत ऑस्ट्रेलियावर 137 धावांनी मात केल्यानंतर भारताने 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली. मात्र ऐतिहासीक बॉक्सिंग डे कसोटीत झालेला हा पराभव ऑस्ट्रेलियन कर्णधार टीम पेनच्या चांगलाच जिव्हारी लागलेला दिसतोय. सामना संपल्यानंतर टीम पेनने क्युरेटवर टीकास्त्र सोडलं आहे. मेलबर्न कसोटी जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियाला 399 धावांची गरज होती. चौथ्या दिवशी कांगारुंचे 8 फलंदाज माघारी परतले होते. मात्र पॅट कमिन्स आणि नॅथन लॉयनने भारताचा विजय लांबवला. अखेरच्या दिवशी पहिलं सत्र पावसामुळे वाया गेलं, मात्र सामना सुरु झाल्यानंतर भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा शेपटाला पुन्हा डोकं वर काढण्याची संधी न देताच सामन्यावर शिक्कामोर्तब केलं.
“आमच्या गोलंदाजांनी चांगल्या गती व योग्य टप्प्यात चेंडू ठेवत काही विकेट घेतल्या. भारतात केल्यावर तुम्हाला कधीही अशी उसळी घेणारी खेळपट्टी पहायला मिळत नाही. मात्र भारतीय संघाला त्यांना हवी तशी खेळपट्टी मिळाल्यामुळे याचा त्यांना फायदा झाला. त्यातच आमच्या सुरुवातीच्या काही फलंदाजांनी विकेट फेकत त्यांना आणखी मदत केली. मात्र, काही बाबतींमध्ये भारतीय संघ नक्कीच आमच्यापेक्षा वरचढ होता.” Macquarie Sports Radio Cricket ला दिलेल्या मुलाखतीत पेन बोलत होता.
अवश्य वाचा – IND vs AUS : बॉक्सिंग डे कसोटीतले हे 11 विक्रम तुम्हाला माहिती आहेत का?
या सामन्यांमधून झालेल्या चुकांमधून आम्हाला शिकायला आवडेल. सध्या आम्ही सर्वोत्तम गोलंदाज असलेल्या संघाशी खेळतो आहेत, मात्र त्या तुलनेत आमच्या आघाडीच्या फळीतील काही फलंदाजांना कसोटी क्रिकेटचा तितकासा अंदाज आलेला नाहीये. त्यामुळे या कसोटी सामन्यातील सकारात्मक बाबींचा विचार करुन पुढच्या सामन्याचा विचार करणं गरजेचं असल्याचंही टीम पेनने स्पष्ट केलंय. दोन्ही देशांमधला चौथा कसोटी सामना 3 जानेवारीपासून सिडनीमध्ये खेळवला जाणार आहे.
अवश्य वाचा – IND vs AUS : भारताच्या गोलंदाजी फळीचं राहुल द्रविडकडून कौतुक