Tim Southee wants to live MS Dhoni life : न्यूझीलंडचा कसोटी कर्णधार टिम साऊदीला बुधवारी सीएट क्रिकेट रेटिंग पुरस्कारांमध्ये वर्षातील सर्वोत्तम टी-२० आंतरराष्ट्रीय गोलंदाज म्हणून निवडण्यात आले. या पुरस्कार सोहळ्यात भारतीय खेळाडूंचा दबदबा पाहायला मिळाला. रोहित शर्मा, विराट कोहली आणि मोहम्मद शमी यांनाही पुरस्कार मिळाले. सीएट क्रिकेट रेटिंग अवॉर्ड्स दरम्यान, टिम साऊदीला विचारण्यात आले की तो इतर कोणत्याही क्रिकेटपटूसोबत त्याचे आयुष्य बदलू शकतो का, तो कोण असेल आणि का? यावर त्याने भारतीय दिग्गज एमएस धोनीचे नाव घेतले.
सीएट क्रिकेट रेटिंग अवॉर्ड्स दरम्यान टिम साउदीला विचारण्यात आले की, “जर तुला एका दिवसासाठी इतर कोणत्याही क्रिकेटरसोबत तुझे आयुष्य बदलण्याची संधी मिळाली, तर तो कोण असेल आणि का, यावर न्यूझीलंडचा कर्णधार म्हणाला,” एमएस धोनी. मी एमएस धोनी झालो तर आयुष्य कसे असेल ते पाहायचे आहे.” एमएस धोनी जगातील सर्वात आवडत्या क्रिकेटपटूंपैकी एक आहे.
एमएस धोनी जगातील महान कर्णधारांपैकी एक –
भारतासाठी तीन आयसीसी ट्रॉफी आणि पाच आयपीएल विजेतेपद पटकावणाऱ्या एमएस धोनीची गणना जगातील महान कर्णधारांमध्ये केली जाते. २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही एमएस धोनी चाहत्यांमध्ये खूप लोकप्रिय आहे. धोनी आता फक्त आयपीएलमध्ये खेळताना दिसतो. मात्र, गेल्या मोसमात तो गुडघ्याच्या समस्यांशी झुंजत होता आणि पुढच्या मोसमात त्याच्या खेळण्याबाबत साशंकता आहे.
न्यूझीलंड कसोटी संघाला दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी श्रीलंकेला जाण्यापूर्वी नोएडा येथे अफगाणिस्तानविरुद्ध एकमात्र कसोटी खेळायची आहे. टिम साऊदीचा संघ ऑक्टोबरमध्ये तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतात परतेल, त्यानंतर इंग्लंडविरुद्ध मायदेशात तीन कसोटी सामने खेळेल.