ज्या वानखेडेच्या साक्षीने सचिन तेंडुलकरने दोन वर्षांपूर्वी जगज्जेतेपद उंचावले होते, त्याच मैदानावर समस्त क्रिकेटजगताला अलविदा करण्याची घटका आता समीप आली आहे. शुक्रवारी दिवसअखेर वेस्ट इंडिज संघाच्या झालेल्या दयनीय स्थितीनेच १६ नोव्हेंबर २०१३ हा दिवस क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाणार याचा इशारा दिला आहे. क्रिकेटमधील या युगपुरुषाला अलविदा करण्यासाठी आता क्रिकेटविश्वही सज्ज झाले आहे.
ईडन गार्डन्सवरील पहिल्या कसोटीप्रमाणे दुसऱ्या कसोटीचाही शनिवारी तिसऱ्या दिवशीच निकाल लागणार, हे आता स्पष्ट झाले आहे. भारताने पहिल्या डावात ३१३ धावांची आघाडी घेत सामन्यावरील नियंत्रण घट्ट केले आहे. दुसऱ्या दिवसअखेर वेस्ट इंडिजची ३ बाद ४३ अशी केविलवाणी अवस्था झाली आहे आणि ते अद्याप २७० धावांनी पिछाडीवर आहेत. या परिस्थितीत वेस्ट इंडिजला डावाने पराभव टाळणे मुश्किल जाणार आहे. या सुखद परिस्थितीत वानखेडेच्या साक्षीने दुसऱ्या कसोटीसह मालिकेवर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करून सचिनला शानदार विजयानिशी अलविदा करण्यासाठी भारतीय संघ उत्सुक आहे. शुक्रवारच्या दिवसभराच्या खेळावर सचिनच्या अविस्मरणीय खेळीने तसेच चेतेश्वर पुजारा आणि रोहित शर्माच्या शतकाने छाप पाडली.
शुक्रवारी सकाळी सचिनने चेतेश्वर पुजारासोबत तिसऱ्या विकेटसाठी १४४ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचून भारताला सुस्थितीत नेले. परंतु सर्वाचे लक्ष सचिनच्या खेळाकडेच वेधले होते. त्याने क्रिकेटरसिकांच्या अपेक्षांची पूर्तता करीत आपली ७४ धावांची खेळी साकारली. त्यानंतर चेतेश्वर पुजाराने १२ चौकारांसह ११३ धावांची शतकी खेळी उभारली. पुजाराच्या या संयमी खेळीने भारताची आघाडी आणखी वाढली. त्याने वैयक्तिक पाचवे तर वानखेडेवरील दुसरे शतक साकारले. परंतु सचिन बाद झाल्यानंतर क्रिकेटरसिकांचा सामन्यातील उत्साह मावळला होता. परंतु उत्तरार्धात क्रिकेटरसिकांना पुन्हा जल्लोष करायला भाग पाडले ते रोहित शर्माने. त्यामुळे चहापानानंतर ‘रोहित.. रोहित..’ हा जयघोष निनादू लागला.
प्रग्यान ओझा बाद झाला तेव्हा भारताची ९ बाद ४१५ अशी समाधानकारक स्थिती होती. समोर मोहम्मद शामी हा अखेरचा फलंदाज होता आणि रोहित ४६ धावांवर खेळत होता. परंतु रोहित डगमगला नाही. शामीला सोबतीला घेत त्याने चिवट फलंदाजीचे यथोचीत दर्शन घडवले आणि सचिनच्या अखेरच्या कसोटीला एका मुंबईकराने शतकी सलाम ठोकला.
रोहितने आपल्या घरच्या मैदानावर कोणत्याही वेस्ट इंडिज गोलंदाजांची तमा बाळगली नाही. ९९ धावांवर पोहोचल्यावर मार्लन सॅम्युअल्सच्या चेंडूवर लाँग ऑनच्या दिशेने चेंडू स्टेडियममध्ये भिरकावून त्याने आपले सलग दुसरे शतक साजरे केले. १२७ चेंडूंत ११ चौकार आणि ३ षटकारांनिशी ही त्याची अवतरली. ईडन गार्डन्सच्या पदार्पणाच्या कसोटीतही भारताचा संघ निम्मा तंबूत परतल्यावर त्याने आर. अश्विनला साथीला घेत १७७ धावांची तडाखेबंद खेळी उभारली होती. शामीसोबत खेळताना त्याने एकेरी धावांचा मोह न बाळगता मोठय़ा फटक्यांवरच अधिक भर दिला. रोहितने शामीसोबत अखेरच्या विकेटसाठी ८० धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. त्यामुळेच भारताला पहिल्या डावात ४९५ अशी विशाल धावसंख्या उभारता आली.
त्यानंतर उत्तरार्धाच्या खेळात सचिनोत्सवाच्या दडपणाखाली वेस्ट इंडिजचे किरान पॉवेल, टिनो बेस्ट आणि डॅरेन ब्राव्हो हे तीन फलंदाज बाद झाले. आर. अश्विन आणि प्रग्यान ओझा या फिरकी गोलंदाजांनी खेळपट्टीचा फायदा घेत आपले काम चोख बजावले आहे. ख्रिस गेल आणि शिवनारायण चंदरपॉल हे दोन भरवशाचे फलंदाज अजून बाद व्हायचे आहेत. परंतु तरीही भारताला तिसऱ्या दिवशीच विजयाचा जल्लोष साजरा करता येऊ शकेल, असे संकेत दुसऱ्या दिवसाच्या खेळाने तरी नक्कीच दिले आहेत.
* ७४ धावा, ११८ चेंडू, १२ चौकार , ६२.७ सरासरी
धावफलक
वेस्ट इंडिज (पहिला डाव) : १८२
भारत (पहिला डाव) : मुरली विजय झे. सॅमी गो. शिलिंगफोर्ड ४३, शिखर धवन झे. चंदरपॉल गो. शिलिंगफोर्ड ३३, चेतेश्वर पुजारा झे. आणि गो. शिलिंगफोर्ड ११३, सचिन तेंडुलकर झे. सॅमी गो. देवनरिन ७४, विराट कोहली झे. सॅमी गो. शिलिंगफोर्ड ५७, रोहित शर्मा नाबाद १११, महेंद्रसिंग धोनी झे. सॅमी गो. बेस्ट ४, आर. अश्विन झे. आणि गो. गॅब्रिएल ३०, भुवनेश्वर कुमार झे. सॅमी गो. शिलिंगफोर्ड ४, प्रग्यान ओझा धावचीत ०, मोहम्मद शामी झे. बेस्ट गो. देवनरिन ११, अवांतर (बाइज ८, लेगबाइज २, वाइड २, नोबॉल ३) १५, एकूण १०८ षटकांत सर्व बाद ४९५
बाद क्रम : १-७७, २-७७, ३-२२१, ४-३१५, ५-३५४, ६-३६५, ७-४०९, ८-४१४, ९-४१५, १०-४९५
गोलंदाजी : डॅरेन सॅमी ९-१-४१-०, शेनॉन गॅब्रिएल १६-०-८५-१, शेन शिलिंगफोर्ड ४३-६-१७९-५, टिनो बेस्ट १८-०-९३-१, मार्लन सॅम्युअल्स ११-०-४२-०, नरसिंग देवनरिन ११-०-४५-२.
वेस्ट इंडिज (दुसरा डाव) : ख्रिस गेल नाबाद ६, किरान पॉवेल झे. शामी गो. अश्विन ९, टिनो बेस्ट पायचीत गो. ओझा ९, डॅरेन ब्राव्हो झे. विजय गो. अश्विन ११, अवांतर (बाइज ४, लेगबाइज ४) ८, एकूण १२.२ षटकांत ३ बाद ४३
बाद क्रम : १-१५, २-२८, ३-४३
गोलंदाजी : भुवनेश्वर कुमार ३-०-४-०, मोहम्मद शामी २-०-७-०, आर. अश्विन ४.२-२-१२-२, प्रग्यान ओझा ३-१-१२-१.

Story img Loader