दक्षिण कोरियात या महिन्यात होणारी आशियाई क्रीडा स्पर्धा माझ्यासाठी रिओ ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेची रंगीत तालीम असणार आहे. गतवेळच्या आशियाई स्पर्धेत मला ८०० मीटर धावण्यात कांस्यपदक मिळाले होते, आता मात्र सुवर्णपदक मिळविणे हेच माझे मुख्य ध्येय असेल, असे भारताची अव्वल दर्जाची धावपटू टिंटू लुकाने सांगितले. ‘भारताची सुवर्णकन्या’ पी.टी.उषा हिच्या मार्गदर्शनाखाली सराव करणाऱ्या टिंटूकडून ८०० मीटर शर्यतीत अव्वल कामगिरीची अपेक्षा आहे. गुवांगझाऊ येथे २०१०मध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत तिला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले होते. ग्लासगो येथील राष्ट्रकुल स्पर्धेतही तिला कांस्यपदक मिळाले. गत वर्षी पुण्यात झालेल्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेतही तिची मजल कांस्यपदकापर्यंत होती. आगामी आशियाई स्पर्धेविषयी तिच्याशी केलेली खास बातचीत-
*आशियाई क्रीडा स्पर्धेतील कामगिरीबाबत तुझा काय अंदाज आहे?
या स्पर्धेसाठी मी खूप मेहनत घेतली आहे. गतवेळी मला अपेक्षेइतका वेग अंतिम टप्प्यात ठेवता आला नव्हता, त्यामुळे माझे सुवर्ण व रौप्यपदक हुकले होते. यंदा तशी चूक होणार नाही याची काळजी मी घेणार आहे. सातत्यपूर्ण वेग ठेवत अव्वल कामगिरी करण्याचे माझे ध्येय आहे.
*बऱ्याच वेळा अंतिम टप्प्यात तुझ्यावर दडपण येते काय?
काही वेळा मी मानसिक दडपणाखाली पदकाची हुकमी संधी गमावली आहे. मात्र प्रत्येक वेळी असे घडते असे मी म्हणणार नाही. माझे प्रतिस्पर्धीही अतिशय चांगल्या रीतीने तयारी करून येत असतात. त्यांच्या तुलनेत मी थोडीशी कमी पडते. ही उणीव दूर करण्याचा माझाकसोशीने प्रयत्न सुरू आहे. त्याकरिता योगासने, ध्यानधारणा आदी पूरक व्यायाम मी करीत आहे.  
*लंडन ऑलिम्पिकमध्ये तुझी कामगिरी अपेक्षेइतकी नव्हती, त्याचे कारण काय सांगता येईल ?
लंडन येथे माझ्याकडून पदकाच्या अपेक्षा होत्या. मात्र तिथे आव्हान खूपच खडतर होते. त्याचा अंदाज घेण्यात मी कमी पडले. तसेच हवामानही प्रतिकूल होते. त्यामुळे मी अपेक्षेइतका वेग ठेवू शकले नाही. रिओ येथे २०१६मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकसाठी आगामी आशियाई स्पर्धा माझ्यासाठी पूर्वतयारीची कसोटी आहे. हेच ध्येय डोळ्यासमोर मी ठेवले आहे.
*तुझ्या मार्गदर्शक उषा यांच्याविषयी तू काय सांगशील?
उषाताई माझ्यासाठी सर्वस्व आहेत. मला केवळ प्रशिक्षकाच्या भूमिकेतून नव्हे तर आईसारखे प्रेम मला त्यांच्याकडून मिळत आहे. ऑलिम्पिकमध्ये पदक मिळविण्याचे त्यांचे स्वप्न मी साकार करावे हीच त्यांची इच्छा आहे व त्या दृष्टीने माझ्यावर मोठी जबाबदारी आहे. त्यांचे अपुरे राहिलेले स्वप्न मी २०१६मध्ये साकार करीन अशी मला खात्री आहे.
*शासनाकडून तुला कसे सहकार्य मिळत आहे?
शासनाने आमच्यासाठी खूप काही केले आहे. मला राज्य सरकारने उच्च पदावर नोकरी देण्याचे मान्य केले आहे. अलीकडेच केंद्र शासनाने मला अर्जुन पुरस्काराने सन्मानित केले आहे. माझ्यासाठी हा पुरस्कार प्रेरणादायक आहे.

Story img Loader