ज्येष्ठ ऑलिम्पिकपटू पी. टी. उषा यांची शिष्या टिंटू लुका हिने आठशे मीटर धावण्याची शर्यत जिंकून वरिष्ठ आशियाई मैदानी स्पर्धेत कौतुकास्पद कामगिरी केली. तिने मिळविलेल्या सुवर्णपदकांसह भारताने चार सुवर्ण, पाच रौप्य व चार कांस्यपदके अशी एकूण तेरा पदके मिळवीत पदकतालिकेत तिसरे स्थान मिळविले.
या स्पर्धेतील शेवटच्या दिवशी भारताने पाच पदकांची कमाई केली. टिंटू हिने आठशे मीटरचे अंतर दोन मिनिटे १.५३ सेकंदात पार केले. आंतरराष्ट्रीय स्तरावरील तिचे हे पहिलेच सुवर्णपदक आहे. टिंटू या २६ वर्षीय खेळाडूने कारकीर्दीतील वैयक्तिक शर्यतीत पहिलेच विजेतेपद मिळविले आहे. तिने २०१३ व २०१४ मध्ये चार बाय चारशे मीटर रिले शर्यतीत विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाचा वाटा उचलला होता. तिने २०१० मध्ये क्रोएशियात झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत हे अंतर एक मिनिट ५९.१७ सेकंदात पार करीत राष्ट्रीय विक्रम नोंदविला होता. मात्र येथे तिला दोन मिनिटे एक सेकंद ही ऑलिम्पिक पात्रता वेळ पार करता आली नाही.
चीनच्या झाओ जिंग हिने ही शर्यत दोन मिनिटे ३.४० सेकंदात पार करीत रौप्यपदक मिळविले तर श्रीलंकेच्या निमाली क्लाराछिंगे (२ मिनिटे ३.९४ सेकंद) हिला कांस्यपदक मिळाले.
चीन संघाने १५ सुवर्ण, तेरा रौप्य व तेरा कांस्य अशी एकूण ४१ पदके मिळवीत प्रथम स्थान मिळविले. कतारने सात सुवर्ण, दोन रौप्य व एक कांस्य अशी एकूण दहा पदके मिळवीत दुसरा क्रमांक पटकाविला.
पुरुषांच्या विभागात भारताच्या जिन्सान जॉन्सन याने रौप्यपदक मिळविताना एक मिनिट ४९.६९ सेकंद वेळ नोंदविली. गतवेळचा विजेता मुसाब बाला (एक मिनिट ४९.४० सेकंद) या कतारच्या खेळाडूने या शर्यतीत विजेतेपद राखले. पुरुषांच्याच दोनशे मीटर धावण्याच्या शर्यतीत धरमबीरसिंग याने कांस्यपदक मिळविले. त्याने हे अंतर २०.६६ सेकंदात पार केले व अनिलकुमार याने पंधरा वर्षांपूर्वी नोंदविलेला २०.७३ सेकंद हा राष्ट्रीय विक्रम मोडला.
श्रावणी नंदा हिने महिलांमध्ये दोनशे मीटर शर्यतीत कांस्यपदक पटकाविले. तिने हे अंतर २३.५४ सेकंदात पार केले. तिचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील हे पहिलेच पदक आहे. महिलांच्या चार बाय चारशे मीटर रिलेमधील भारताची मक्तेदारी येथे चीन संघाने मोडून काढली. चीन संघाने हे अंतर तीन मिनिटे ३३.४४ सेकंदात पार करीत सुवर्णपदक जिंकले. भारतीय संघाने हे अंतर तीन मिनिटे ३३.८१ सेकंदात पूर्ण करीत रौप्यपदक मिळविले. कझाकिस्तानला कांस्यपदक मिळाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा