भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धची एकमेव ट्वेन्टी-२० लढत जिंकून बऱ्याच महिन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये थाटात पुनरागमन केले. विजयाचा श्रीगणेशा केला. त्यानंतर आता कांगारूंविरुद्ध रविवारपासून पुण्यातील गहुंजे स्टेडियमवर सुरू होणाऱ्या सात एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत विजयादिवशीच्या मुहूर्तावर विजयी श्रीगणेशा करण्यासाठी भारतीय संघ उत्सुक आहे.
महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या स्टेडियमवर प्रथमच आंतरराष्ट्रीय सामना होत असल्यामुळे या सामन्याबाबत चाहत्यांमध्ये कमालीची उत्कंठा निर्माण झाली आहे. भारताने ट्वेन्टी-२० सामन्यात दोनशे धावांचेही लक्ष्य साकार केले होते. या विजयामुळे भारताचा आत्मविश्वास उंचावला आहे. त्याचा फायदा त्यांना पहिल्या एकदिवसीय लढतीत मिळणार आहे. तसेच अनुकूल वातावरण व प्रेक्षकांचा पाठिंबा या दोन्ही गोष्टीही भारतीय संघाला लाभदायक असणार आहेत.
रविवार व विजयादशमीची सुट्टी असा योग जुळून आल्यामुळे दिवस-रात्र रंगणाऱ्या या सामन्यासाठी स्टेडियम ‘हाऊसफुल्ल’ होण्याची शक्यता आहे. जवळजवळ सर्व तिकिटे विकली गेली असल्याचे संयोजकांकडून सांगण्यात आले.
भारतीय संघाच्या सलामीची जबाबदारी शिखर धवन व रोहित शर्मा यांच्याकडेच दिली जाणार आहे. फलंदाजीत युवराज सिंगला गवसलेला सूर ही भारतासाठी मनोधैर्य उंचावणारी गोष्ट आहे. सुरेश रैना, विराट कोहली व कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांच्याकडूनही भारताला चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. भारतीय संघात आठव्या क्रमांकापर्यंत फलंदाज आहेत, पण प्रत्यक्षात कागदावर सरस वाटणारी भारताची फलंदाजी कितपत बहरतेय, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. भुवनेश्वर कुमार, इशांत शर्मा या वेगवान गोलंदाजांपाठोपाठ रवीचंद्रन अश्विन व रवींद्र जडेजा या फिरकी गोलंदाजांकडून प्रभावी कामगिरीची अपेक्षा आहे.
आयपीएलमध्ये खेळणाऱ्या फिन्च, ग्लेन मॅक्सवेल, जेम्स फॉकनर आणि शेन वॉटसन यांना भारतीय वातावरण व खेळपट्टय़ांची सवय आहे, ही त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे. कर्णधार जॉर्ज बेली, वॉटसन, फिन्च व मॅक्सवेल हे भारतीय गोलंदाजांना कसे सामोरे जातात, यावरच त्यांच्या संघाचे यशापयश अवलंबून आहे.
संघ :
भारत : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, सुरेश रैना, युवराज सिंग, अंबाती रायुडू, रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अमित मिश्रा, भुवनेश्वर कुमार, इशांत शर्मा, आर. विनय कुमार, जयदेव उनाडकट, मोहम्मद शमी.
ऑस्ट्रेलिया : जॉर्ज बेली (कर्णधार), शेन वॉटसन, झेवियर डोहर्टी, कलम फग्र्युसन, आरोन फिन्च, मोझेस हेन्रिक्स, फिलीप ह्य़ुजेस, जेम्स फॉकनर, ग्लेन मॅक्सवेल, ब्रॅड हॅडिन, नॅथन कोल्टर-निले, क्लिन्ट मकाय, अ‍ॅडम व्होग्ज, मिचेल जॉन्सन.
सामन्याची वेळ : दुपारी दीड वाजल्यापासून
थेट प्रक्षेपण : स्टार क्रिकेट
ट्वेन्टी-२० लढतीतील पराभवानंतर भारताविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात आमच्या कामगिरीत सुधारणा दिसेल व पराभवाची परतफेड आम्ही करू. दवाचा थोडासा परिणाम दुसऱ्या सत्रात फलंदाजी करणाऱ्यांना जाणवण्याची शक्यता आहे.
जॉर्ज बेली, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार

सचिन तेंडुलकर हा महान खेळाडू आहे आणि त्याच्या दोनशेव्या कसोटीला अलोट गर्दी उसळेल. सचिनच्या या अखेरच्या कसोटी सामन्याच्या वेळी स्टेडियम ‘हाऊसफुल’ पाहण्याचे माझे स्वप्न साकार होईल. शेवटच्या कसोटीत सचिनचा खेळ पाहायला व त्याच्यावर प्रेम करणाऱ्या असंख्य चाहत्यांनी स्टेडियम पूर्णपर्ण भरून जावो अशीच माझी इच्छा आहे. आजपर्यंत कसोटीच्या वेळी पूर्ण भरलेले स्टेडियम मी पाहिलेले नाही.
महेंद्रसिंग धोनी, भारताचा कर्णधार