नवी दिल्ली : विराट कोहली गेली दोन वर्षे धावांसाठी झगडत आहे, परंतु बाबर आझमची जागतिक क्रिकेटमधील सार्वकालिक सर्वोत्तम म्हणून बिरुद मिरवणाऱ्या कोहलीशी तुलना करणे, हे घाईचे ठरेल, असे मत पाकिस्तानचा माजी कर्णधार वसिम अक्रमने व्यक्त केले आहे.
दुबईत होणाऱ्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत रविवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यात सलामीचा सामना होणार आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत विश्रांती घेणारा कोहली ताजातवाना होऊन या स्पर्धेसाठी सज्ज होत आहे.
कोहलीला नोव्हेंबर २०१९नंतर एकही शतक साकारता आलेले नाही, परंतु बाबर तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये सातत्याने धावा करीत आहे.
‘‘कोहलीबाबत भारतीय चाहत्यांची टीका ही अनावश्यक आहे. तो एक सर्वोत्तम फलंदाज असल्याचे त्याने सिद्ध केले आहे. याचप्रमाणे कोहलीकडे अजूनही सामने जिंकण्याची क्षमता आहे. भारतीय संघातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांपैकी त्याची गणना केली जाते,’’ असे अक्रम म्हणाला.
‘‘तुलना करणे ही नैसर्गिक असते. चाहते इन्झमाम उल हक, राहुल द्रविड आणि सचिन तेंडुलकर यांचीही तुलना करायचे. त्याआधी सुनील गावस्कर, जावेद मियाँदाद, जी. विश्वनाथ आणि झहीर अब्बास यांचीही तुलना व्हायची. बाबरच्या खेळात सातत्य आहे. त्याचे फलंदाजीचे तंत्रसुद्धा उत्तम आहे. तो युवा कर्णधार असून, त्याचे वेगाने आत्मसात करतो. पण तरीही विराटशी त्याची तुलना करण्याची घाई करू नये,’’ असे अक्रमने सांगितले.
शाहीनच्या अनुपस्थितीची चिंता
गतवर्षीच्या ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारताच्या आघाडीच्या फळीला भेदणाऱ्या शाहीन आफ्रिदीच्या अनुपस्थितीमुळे पाकिस्तानच्या चिंतेत भर पडल्याचे अक्रमने सांगितले. गुडघ्याच्या दुखापतीमुळे शाहीनने आशिया चषक स्पर्धेतून माघार घेतली आहे. ‘‘जगातील सर्वोत्तम तीन गोलंदाजांपैकी एक मानल्या जाणाऱ्या शाहीनकडे नवा चेंडू हाताळण्याची क्षमता आहे. ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंचे फलंदाज सुरुवातीला लवकर बाद करून दडपण आणता येते,’’ असे अक्रम यावेळी म्हणाला.