मुंबईत नुकताच गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात पार पडला. ११ दिवस आपल्या आवडत्या गणरायाची मनोभावे सेवा केल्यानंतर सर्व मुंबईकरांनी बाप्पाला वाजत-गाजत निरोप दिला. सध्या मुंबईत प्रो-कबड्डीचं चांगलंच वारं आहे. सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये अडखळत खेळणाऱ्या यू मुम्बाच्या संघाने आता स्पर्धेत चांगलाच जोर पकडला आहे. आपल्या लाडक्या संघाने यंदाचं पर्व जिंकावं म्हणून मुंबईतल्या ‘गिरगावचा राजा’ या मंडळाने थेट आपल्या बाप्पालाच मैदानात उतरवलं होतं. गणपती बाप्पा आपल्या उंदीरमामांसोबत कबड्डी खेळतानाची मूर्ती सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या आगळ्या वेगळ्या प्रयत्नांबद्दल ‘लोकसत्ता ऑनलाईन’ने मंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला. सध्या मुंबईत कबड्डीचं प्रचंड वेड आहे. मुळचे मुंबईकर असलेले अनेक खेळाडू सध्या प्रो-कबड्डीत विविध संघांकडून खेळत आहेत. विशाल माने, रिशांक देवाडीगाष, श्रीकांत जाधव ही त्यापैकी काही महत्वाची नावं. मग आपल्या आवडत्या संघाला पाठिंबा देण्यासाठी यंदा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी एक वेगळीच शक्कल लढवली. त्यांनी आपल्या बाप्पाला कबड्डीपटूच्या वेशात उतरवत, त्याला आपल्या उंदीरमामांसोबत कबड्डी खेळायला लावलं.

“आमच्या या संकल्पनेला यू मुम्बाच्या टीम मॅनेजमेंटनेही चांगला प्रतिसाद दिला. गणेशोत्सवात आमच्या या मूर्तीला अनेकांनी चांगला प्रतिसाद दिला. या मूर्तीसोबत आम्ही लहान मुलांसाठी यू मुम्बाच्या खेळाडूंसोबत सेल्फी, विविध खेळ अशा संकल्पना राबवल्या होत्या. अनेक लहान मुलांनी आपच्या मुख्य मूर्तीऐवजी या लहानग्या बाप्पाचं दर्शन घेणं पसंत केलं. यू मुम्बाचा संघही आमच्या या बाप्पाचं दर्शन घेणार होता. मात्र पावसामुळे त्यांना आमच्या मंडळाला भेट देता आली नाही.” गिरगावचा राजा मंडळाचे सह-खजिनदार गणेश लिंगायत यांनी आपल्या उपक्रमाविषयी अधिक माहिती दिली.

सध्या गुणतालिकेत यू मुम्बाचा संघ तिसऱ्या स्थानावर आहे. उपांत्य फेरीत प्रवेश मिळवण्यासाठी संघाला आणखी काही विजयांची गरज आहे. गेल्या काही सामन्यांमध्ये यू मुम्बाकडून काशिलींग अडके, श्रीकांत जाधव या मराठमोळ्या खेळाडूंनी अतिशय आक्रमक खेळ केला आहे. एका बाजूने कॅप्टन कूल म्हणून ओळख असलेला अनुप कुमार संघाची कमान सांभाळतो आहे. त्यामुळे आपल्या बाप्पाचे आशीर्वाद आणि खडतर मेहनत या जोरावर मुम्बाचा संघ यंदाच्या पर्वाचं विजेतेपद पटकावेल, असा आत्मविश्वास चाहत्यांनी व्यक्त केलाय.

कबड्डी खेळणाऱ्या बाप्पाची काही खास क्षणचित्रे तुमच्यासाठी –

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: To support u mumba in pro kabaddi famous pandal girgaon cha raja made lord ganesha in sportsman attire