एकदिवसीय विश्वचषक २०२३ चे सुधारित वेळापत्रक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) गुरुवारी जाहीर केले आहे. यामध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान सह नऊ सामन्यांमध्ये बदल करण्यात आला आहे. विश्वचषकाची तिकिटे २५ ऑगस्टपासून विक्रीसाठी ठेवली जातील. ५ ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर मागच्या विश्वचषकातील अंतिम फेरीतील इंग्लंड आणि न्यूझीलंडचे संघ एकमेकांशी भिडतील आणि स्पर्धेला सुरुवात होईल.

ICCने पुढे घोषणा केली की चाहत्यांमध्ये गोंधळ टाळण्यासाठी भारताच्या सामन्यांसाठी टप्प्याटप्प्याने तिकिटांची विक्री केली जाईल. २५ ऑगस्ट रोजी, सर्व भारत सोडून इतर मुख्य सामने आणि सराव सामन्यांची तिकीटविक्री सुरू होईल. याचा अर्थ भारत वगळता इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि नेदरलँड या नऊ संघांच्या सर्व सामन्यांची तिकिटे २५ ऑगस्टपासून बुक करता येतील.

ICCने तिकीट विक्री सामन्यांच्या ठिकाणांच्या आधारे विभाजित करण्याचा निर्णय घेतल्याने भारताच्या सामन्यांसाठी गोष्टी थोड्या अवघड होतात. भारताच्या सराव सामन्यांची तिकिटे ३० ऑगस्टपासून सुरू होतील. मुख्य फेरीची तिकिटे ३१ ऑगस्टपासून उपलब्ध होतील. विशेष म्हणजे, भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याची तिकिटे आता ३ सप्टेंबर पासून मिळतील कारण सामन्याची तारीख ही १५ ऑक्टोबर ऐवजी १४ ऑक्टोबर करण्यात आली आहे.

तिकिटांच्या घोषणांबद्दल नियमित माहिती मिळवण्यासाठी ICC ने चाहत्यांना त्यांच्या वेबसाइटवर नोंदणी करण्याचा सल्ला दिला आहे, ज्याची लिंक १५ ऑगस्टपासून सक्रिय होईल. तिकिटांची अपेक्षित मागणी व्यवस्थापित करण्यासाठी आणि शक्य तितक्या चाहत्यांना जगातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंना पाहण्याची सर्वोत्तम संधी देण्यासाठी, पुढील तारखांना तिकिटांची टप्प्याटप्प्याने विक्री केली जाईल:

हेही वाचा: Asia Cup 2023: आशिया चषकासाठी पाकिस्तानच्या संघाची घोषणा, टीम इंडियासमोर असणार तगडे आव्हान

ICC विश्वचषक २०२३ मधील भारताच्या सामन्यांसाठी तिकीट तपशील

२५ ऑगस्ट: गैर-भारतीय सराव सामने आणि सर्व गैर-भारतीय स्पर्धा सामने

३० ऑगस्ट: गुवाहाटी आणि त्रिवेंद्रम येथे भारताचे सराव सामने

३१ ऑगस्ट: चेन्नई (ऑस्ट्रेलिया विरुद्ध), दिल्ली (अफगाणिस्तान विरुद्ध) आणि पुणे (बांगलादेश विरुद्ध) येथे भारताचे सामने

१ सप्टेंबर: धर्मशाला (न्यूझीलंड विरुद्ध), लखनौ (इंग्लंड विरुद्ध) आणि मुंबई (श्रीलंके विरुद्ध) येथे भारताचे सामने

२ सप्टेंबर: भारताचे बेंगळुरू (नेदरलँड विरुद्ध) आणि कोलकाता (दक्षिण आफ्रिकेविरुद्ध) येथे सामने

३ सप्टेंबर: अहमदाबाद येथे भारताचा सामना (पाकिस्तान विरुद्ध)

१५ सप्टेंबर: उपांत्य फेरी (मुंबई आणि कोलकाता येथे) आणि अंतिम सामना (अहमदाबाद येथे)

तिकीटविक्रीबाबत बोलताना आयसीसी म्हणते की, “यामुळे चाहत्यांना तिकिटाच्या बातम्या सगळ्यात पहिले मिळतील आणि विश्वचषकात त्यांचे तिकीट सुरक्षित करण्यात मदत होईल आणि एका दिवसात क्रिकेटचा आनंद अनुभवता येईल.” यापुढे बोलताना बीसीसीआयचे सीईओ हेमांग अमीन म्हणाले की, “आम्हाला हे जाहीर करताना आनंद होत आहे की, चाहते आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक २०२३ च्या अधिकृत तिकिटांची माहिती आणि नियमितपणे प्राप्त करण्यासाठी नोंदणी करू शकतात. वेळापत्रक, काही सुधारणांनंतर, आता अंतिम करण्यात आले आहे आणि चाहते आता तिकिटे खरेदी करण्यासाठी आणि उच्च दर्जाचे क्रिकेट पाहण्यासाठी उत्सुक आहेत. तुम्हाला सर्व होस्टिंग स्थळांवर आनंददायी अनुभव मिळावा यासाठी बीसीसीआय कोणतीही कसर सोडणार नाही.”

हेही वाचा: IND vs PAK: मोठी बातमी! वर्ल्ड कपसाठी नवे वेळापत्रक जाहीर, भारत-पाकिस्तानसह नऊ सामन्यांची तारीख बदलली

ICC हेड ऑफ इव्हेंट्स, ख्रिस टेटली म्हणाले की, “ICC पुरुष क्रिकेट विश्वचषक २०२३ च्या तिकीटांची या महिन्यात विक्री सुरू होईल आणि आम्ही क्रिकेटच्या सर्व लाखो चाहत्यांना पुढील आठवड्यापासून तुमची नावे नोंदवण्याचे आवाहन करतो. तिकिटाच्या बातम्या मिळवणारे आणि सर्वात मोठ्या क्रिकेट विश्वचषकाचा भाग असण्यासाठी हे आवश्यक आहे. वेळापत्रकात सुधारणा केल्याने खेळाडू आणि चाहत्यांना वन-डे सामन्याच्या शिखरावर सर्वोत्तम संभाव्य अनुभव मिळेल याची खात्री आहे.”