एकदिवसीय मालिकेत शुभ्र यश मिळवल्यानंतर आता दोन ट्वेन्टी-२० मालिकेचे जेतेपद पटकावण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. भारत आणि यजमान झिम्बाब्वे यांच्यामध्ये पहिला ट्वेन्टी-२० सामना शुक्रवारी खेळवण्यात येणार आहे. एकदिवसीय मालिकेत कुचकामी ठरलेला झिम्बाब्वेचा संघ ट्वेन्टी-२० सामना जिंकण्यासाठी जिवाचे रान करणार आहे.
भारताने एकदिवसीय मालिकेत दमदार कामगिरी करत संघात योग्य समन्वय असल्याचे दाखवून दिले आहे. फलंदाजीमध्ये कर्णधार अजिंक्य रहाणेकडून मोठय़ा अपेक्षा असतील. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघ ढेपाळताना दिसत असताना केदार जाधवने अप्रतिम शतकाचा नमुना पेश केला होता, या शतकानंतर त्याच्याकडून सर्वाच्याच अपेक्षा उंचावलेल्या आहेत. मुरली विजय, मनोज तिवारी, रॉबिन उथप्पा, मनीष पांडे यांना अजूनही छाप पाडता आली नसल्याने त्यांच्यासाठी ही एक चांगली संधी असेल. तीन एकदिवसीय सामन्यात मिळून रॉबिन उथप्पाला केवळ ४५ धावा करता आल्या होत्या. त्याच्याऐवजी युवा संजू सॅमसनला पदार्पणाची संधी मिळू शकते. गोलंदाजीमध्ये भुवनेश्वर कुमार, मोहित शर्मा आणि धवल कुलकर्णी हे मध्यमगती गोलंदाजांचे गुणवान त्रिकुट आहेत. फिरकीमध्ये हरभजन सिंगकडे चांगला अनुभव असून अक्षर पटेल हा सातत्याने भेदक मारा करत आहे.
झिम्बाब्वेच्या कामगिरीमध्ये सातत्याचा अभाव पाहायला मिळाला आहे. कर्णधार एल्टन चिगुंबुराकडे मोठी खेळी साकारण्याची क्षमता आहे. त्याचबरोबर युवा खेळाडूंकडे चांगली गुणवत्ता आणि ऊर्जा असून भारताचा धक्का देण्याची कुवत नक्कीच त्यांच्यामध्ये आहे.
भारतीय संघाने गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात शेवटचा ट्वेन्टी-२० सामना खेळला होता. मात्र त्या सामन्यातील बहुतांशी खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेत चमकादार कामगिरी करणाऱ्या केदार जाधव, मनीष पांडे, संदीप शर्मा यांना पदार्पणची संधी मिळू शकते. दुसरीकडे पाकिस्तान दौऱ्यात झिम्बाब्वेला दोन्ही ट्वेन्टी-२० सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. मात्र दोन्ही लढतींमध्ये शेवटच्या चेंडूवर सामन्याचा निकाल लागला होता. त्यामुळे झिम्बाब्वेचा संघ भारताला कडवी टक्कर देण्यासाठी सक्षम आहे. मांडीच्या स्नायूंना झालेल्या दुखापतीमुळे क्रेग इरव्हाइन एकदिवसीय मालिकेत खेळू शकला नव्हता. ट्वेन्टी-२० मालिकेत तो झिम्बाब्वे संघाचा महत्त्वपूर्ण भाग असणार आहे. चार्ल्स कोवेन्ट्री आणि ख्रिस्तोफर मोफू या अनुभवी खेळाडूंचे पुनरागमन झिम्बाब्वेसाठी जमेची बाजू आहे.
एकदिवसीय मालिकेसाठी वापरण्यात आलेल्या खेळपट्टीवरच ट्वेन्टी-२० सामने होणार असल्याने स्विंगला पोषक संथ खेळपट्टी असणार आहे.
प्रमुख खेळाडूंच्या उपस्थितीत खेळताना एकदिवसीय मालिकेत भारतीय खेळाडूंना विजयासाठी संघर्ष करावा लागला होता. इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेत दमदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा भरणा असलेला भारतीय संघ कशी कामगिरी करतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा