सुदिरामन चषक बॅडमिंटन स्पर्धा

सुदिरामन चषक बॅडमिंटन स्पर्धेत बाद फेरीचे उद्दिष्ट ठेवून खेळणाऱ्या भारताची १डी गटात मंगळवारी युवा खेळाडूंचा भरणा असलेल्या मलेशियाशी पहिली लढत होणार आहे. महान बॅडमिंटनपटू ली चोंग वेईची उणीव त्यांना तीव्रतेने भासणार आहे.

२०११ आणि २०१७मध्ये उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारणाऱ्या भारताला २००९मध्ये उपांत्य फेरी गाठणाऱ्या मलेशियाविरुद्धच्या लढतीनंतर चीनविरुद्ध झुंजावे लागणार आहे. या गटात चीनने सलामीच्या लढतीत मलेशियाला ५-० अशी धूळ चारली आहे. त्यामुळे आणखी एका पराभवामुळे मलेशियाचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येऊ शकते.

१३ सदस्यीय भारतीय संघाला यंदाच्या स्पर्धेसाठी आठवे मानांकन लाभले आहे. मागील वर्षी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक जिंकताना भारताने मलेशियावर धक्कादायक विजय मिळवला होता.

भारताच्या आव्हानाची धुरा पी. व्ही. सिंधू, सायना नेहवाल, किदम्बी श्रीकांत आणि समीर वर्मा या एकेरीतील दर्जेदार खेळाडूंवर प्रामुख्याने अवलंबून आहे. मलेशियाकडे गो जि वेई आणि सोनिआ चीह हे महिला एकेरीत आणि ली झि जिआ पुरुष एकेरीत संघाची जबाबदारी सांभाळतील. सोनिआविरुद्ध भारतीय संघ जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानावरील सिंधूला संधी देतो की सायनाला हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

श्रीकांतने सातत्याने उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली आहे, परंतु मागील १३ पैकी ११ स्पर्धामध्ये तो हा टप्पा ओलांडू शकला नाही. इंडिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत त्याने उपविजेतेपद मिळवले होते. झि जिआविरुद्ध तो भारताकडून खेळू शकेल.

दुखापतीतून सावरून सत्त्विक साईराज रनकीरेड्डी परतल्यामुळे भारताच्या पुरुष दुहेरी आणि मिश्र दुहेरीतील आशा उंचावल्या आहेत. ब्राझील आंतरराष्ट्रीय चॅलेंज बॅडमिंटन स्पर्धेत सत्त्विकच्या खांद्याला गंभीर  दुखापत झाली होती. यावेळी पुरुष दुहेरीत तो चिराग शेट्टीसोबत खेळेल, तर मिश्र दुहेरीत अनुभवी अश्विनी पोनप्पाच्या साथीने तो भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.

Story img Loader