पीटीआय, दम्बुला

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महिलांच्या आशिया चषक ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेला आज, शुक्रवारपासून सुरुवात होणार असून गतविजेत्या भारताची सलामीलाच पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानची गाठ पडणार आहे. ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या दृष्टीने ही स्पर्धा महत्त्वाची मानली जात आहे.

भारतीय संघाची आशिया चषकात मक्तेदारी राहिली आहे. भारताने चारपैकी तीन वेळा ट्वेन्टी-२० प्रारुपातील, तर चार वेळा एकदिवसीय प्रारूपातील आशिया चषकाचे जेतेपद मिळवले आहेत. ट्वेन्टी-२० प्रारूपात भारताने २० पैकी १७ सामने जिंकले आहेत. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने २०२२ च्या स्पर्धेतील अंतिम सामन्यात बांगलादेशला नमवले होते. पाकिस्तानविरुद्ध भारताने या स्पर्धेत १४ पैकी ११ सामन्यांत विजय मिळवला आहे. आता भारतीय संघाचा प्रयत्न हीच दमदार कामगिरी कायम राखण्याचा असेल. भारताने या महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेत १-१ अशी बरोबरी नोंदवली.

हेही वाचा >>>ऑलिम्पिकमध्ये सोनेरी यशाचेच ध्येय -सिंधू

भारतासाठी सलामीची फलंदाज स्मृती मनधाना पूर्ण लयीत आहे. तसेच गोलंदाजांनीही गेल्या काही काळात चांगली कामगिरी केली आहे. वेगवान गोलंदाज पूजा वस्त्रकारने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांत आठ गडी बाद केले, तर फिरकी गोलंदाज राधा यादवनेही चमक दाखवली. भारतीय संघात दीप्ती शर्मा, सजीवन साजना आणि श्रेयांका पाटील या फिरकीपटूंचाही समावेश आहे.

पाकिस्तानने आशिया चषकासाठी निदा दारकडे नेतृत्वाची धुरा सोपवली आहे. मात्र, संघात बरेच बदल करण्यात आले आहेत. ईरम जावेद, ओमैमा सोहेल आणि सैयदा आरूब शाह यांना प्रथमच संघात स्थान मिळाले आहे.

● वेळ : सायं. ७ वा.

● थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, , १ हिंदी, हॉटस्टार अॅप.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Today india pakistan match in women asia twenty20 cup sport news amy