पोलार्ड-वॉटसन लढतीकडे सर्वाचे लक्ष
‘हारी बाझी को जीतने वाले को बाझीगर कहते है’.. हे बोल किरॉन पोलार्डने सोमवारी खरे ठरवले. मुंबई इंडियन्सला अखेरच्या चार षटकांत ६४ धावांची आवश्यकता असताना कुणालाही हा चमत्कार घडेल असे वाटले नव्हते. पण कठीण परिस्थितीत हार मानेल, तो पोलार्ड कसला? वानखेडे स्टेडियमवर एक झंझावात क्रिकेटरसिकांनी अनुभवला. त्यामुळे मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या गुणतालिकेत अग्रस्थानावर झेप घेतली. सनरायजर्स हैदराबादच्या आव्हानापुढे आता अंधाराचे ढग दाटले आहेत. पण क्रिकेटवर निस्सीम प्रेम करणाऱ्या मुंबईकरांवर पोलार्डच्या त्या वादळी खेळीचे गारुड अद्याप टिकून आहे. आता बुधवारी वानखेडे स्टेडियमवरील अखेरच्या सामन्यात मुंबईचा सामना आहे तो राहुल द्रविडच्या राजस्थान रॉयल्सशी. या पाश्र्वभूमीवर ‘आज कुछ तूफानी हो जाये’ अशीच अपेक्षा पोलार्ड आणि मुंबईच्या फलंदाजांकडून क्रिकेटरसिक करीत आहेत.
वानखेडे स्टेडियमवरील घरच्या मैदानावर सलग सात सामने जिंकण्याची किमया साधणाऱ्या मुंबई इंडियन्सने उर्वरित दोन सामन्यांपैकी एखादा सामना जरी जिंकल्यास ते बाद फेरीतील स्थान निश्चित करू शकतील. याचप्रमाणे साखळीतून बाद फेरीत अव्वल दोन स्थानांसह जाण्याचीही सुवर्णसंधी त्यांना आहे.
मुंबईचा अष्टपैलू खेळाडू पोलार्डच्या आक्रमणामुळे राजस्थानला एक प्रकारे सावधानतेचा इशाराच देण्यात आला आहे. सवाई मानसिंग स्टेडियमच्या घरच्या मैदानावर आठपैकी आठ सामने जिंकून राजस्थानचा संघसुद्धा रुबाबात मुंबईच्या स्वारीवर आला आहे. याआधी १७ एप्रिलला राजस्थानमध्ये उभय संघ एकमेकांशी भिडले होते. अजिंक्य रहाणेने ५४ चेंडूंत साकारलेल्या नाबाद ६८ धावांच्या खेळीच्या बळावर राजस्थानने ३ बाद १७९ असे आव्हान उभे केले होते. पण त्यानंतर राजस्थानच्या गोलंदाजांनी दिग्गज फलंदाजांचा समावेश असलेल्या मुंबई इंडियन्सचा डाव १८.२ षटकांत फक्त ९२ धावांत गुंडाळण्याची किमया साधली होती. त्या पराभवाची परतफेड करण्यासाठी मुंबई उत्सुक आहे. पण मुंबई इंडियन्ससाठी डोकेदुखी ठरलेला अजिंक्य आता तर वानखेडेच्या घरच्या मैदानावर खेळणार आहे. सातत्यपूर्ण फलंदाजी करणाऱ्या अजिंक्यने १४ सामन्यांत ४३३ धावा केल्या आहेत.
पोलार्डला सूर गवसला, ही मुंबईसाठी सुखद बाब आहे. कारण आयपीएल स्पर्धा आता अखेरच्या टप्प्यात आली आहे. मोठी आव्हाने आणि दिग्गज प्रतिस्पध्र्याचा सामना आता करावा लागणार आहे. सचिन तेंडुलकर आणि ड्वेन स्मिथ यांच्या सलामीवर मुंबई इंडियन्सच्या फलंदाजीचे भवितव्य अवलंबून असते. पण सोमवारी हैदराबाद सनरायजर्सविरुद्धच्या सामन्यात सचिनने एक उत्तुंग षटकार खेचल्यानंतर मैदान सोडले. त्याच्या दुखापतीची चिंताही मुंबई इंडियन्सला आहे. याचप्रमाणे स्मिथ फॉर्मसुद्धा मुंबईला सतावत आहे. या परिस्थितीत धावांसाठी झगडणारा मुंबई इंडियन्सचा मूळ संघनायक रिकी पाँटिंग संघात परतू शकेल.
यष्टीरक्षक-फलंदाज दिनेश कार्तिक धावांचा पाऊस पाडत आहे. त्याने १४ सामन्यांत ४३५ धावा आतापर्यंत केल्या आहेत. कप्तान रोहित शर्मासुद्धा फॉर्मात आहे. त्याने चार अर्धशतकांच्या साहाय्याने ४५७ धावा केल्या आहेत. मधल्या फळीतील फलंदाज अंबाती रायुडूकडूनसुद्धा पुरेशा धावा झालेल्या नाहीत. त्याने फक्त १६३ धावा केल्या आहेत.
मिचेल जॉन्सन (२० बळी) आणि लसिथ मलिंगा (१३ बळी) या वेगवान गोलंदाजांवर मुंबई इंडियन्सच्या वेगवान माऱ्याची मदार आहे. याचप्रमाणे हरभजन सिंग (१७ बळी) आणि प्रग्यान ओझा (१४ बळी) यांच्यावर मुंबईच्या फिरकीची धुरा आहे.
राजस्थान रॉयल्सची आयपीएल हंगामातील घोडदौड स्वप्नवत अशीच होत आहे. सामन्याचे चित्र पालटण्याची क्षमता असलेला अष्टपैलू शेन वॉटसन आता मैदानावर चमत्कार दाखवू लागला आहे. १२ सामन्यांत ४८३ धावा आणि ८ बळी त्याच्या खात्यावर आहेत. या पाश्र्वभूमीवर वॉटसन-पोलार्ड लढतीकडे सर्वाचे लक्ष असेल. याशिवाय राहुल द्रविडच्या नेतृत्वाची सर्वत्र तारीफ होत आहे. त्याने १४ सामन्यांत ३८७ धावा केल्या आहेत.
याचप्रमाणे स्टुअर्ट बिन्नी आपल्या आश्चर्यकारक कामगिरीने लक्ष वेधत आहे. त्याने अष्टपैलू बिन्नीने आतापर्यंत २१९ धावा केल्या आहेत, तर ५ बळी घेतले आहेत. याचप्रमाणे जेम्स फॉल्कनर (१९ बळी) आणि केव्हॉन कूपर (१६ बळी) हे गोलंदाज नवा चेंडू हाताळण्यात वाकबगार आहेत.
बुधवारच्या सामन्यानंतर राजस्थान आणि मुंबईचा साखळीतील आणखी एक सामना फक्तशिल्लक असेल. दोन्ही संघ प्रतिस्पध्र्याच्या मैदानावर खेळणार आहेत. मुंबई इंडियन्स १८ मे रोजी किंग्ज इलेव्हन पंजाबशी सामना करील, तर राजस्थानचा १७ मे रोजी सनरायजर्सशी सामना आहे.