अंतिम फेरी गाठण्यासाठी दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा सामना

आशिया चषक स्पर्धेत आता साऱ्यांनाच अंतिम फेरीचे वेध लागले आहेत. प्रत्येक संघाची अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी धडपड सुरू असतानाच पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यामध्ये बुधवारी घमासान द्वंद्वं रंगणार आहे. यजमान बांगलादेशने सलग दोन विजय मिळवत आशिया चषक स्पर्धेत आपली दखल घ्यायला लावली आहे. बांगलादेशचा हा साखळीतील अखेरचा सामना आहे. हा सामना जिंकल्यास त्यांचा अंतिम फेरीतील मार्ग सुकर होऊ शकतो. दुसरीकडे पाकिस्तानसाठी हा सामना अतिमहत्त्वाचा असेल, कारण हा सामना गमावल्यास त्यांचे आव्हान संपुष्टात येऊ शकते.

स्पर्धेत आतापर्यंत बांगलादेशचा गोलंदाज मुस्ताफिझूर रहमानने नेत्रदीपक कामगिरी केली असली तरी तो जायबंदी असल्याचा फटका संघाला बसू शकतो. तमीम इक्बालकडून संघाला चांगली सुरुवात करून देण्याची अपेक्षा असेल. बांगलादेशने श्रीलंकेवर विजय मिळवून साऱ्यांनाच धक्का दिला आहे. पण त्यांनी त्यांच्या टीकाकारांना चोख उत्तर द्यायचे असेल तर त्यांना या सामन्यात विजय मिळवावा लागेल.

पाकिस्तानची गोलंदाजी ही जमेची बाजू आहे. मोहम्मद आमीर आणि मोहम्मद सामी यांनी आतापर्यंत भेदक मारा केला आहे. पण पाकिस्तानच्या सलामीवीरांना अजूनही सूर गवसलेला नाही. गेल्या सामन्यात शोएब मलिक आणि उमर अकमल यांनी दमदार कामगिरी केली होती. त्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षा उंचावल्या आहेत. कर्णधार शाहिद आफ्रिदीकडून अजूनही लौकिकाला साजेसा खेळ पाहायला मिळालेला नाही.

प्रतिस्पर्धी संघ

बांगलादेश : मश्रफी मोर्तझा (कर्णधार), तमीम इक्बाल, सोम्या सरकार, मोहम्मद मिथुन, सब्बीर रेहमान, मुशफिकर रहिम, शकिब अल हसन, मोहम्मद रियाध, नुरून हसन (यष्टीरक्षक), तास्किन अहमद, अल अमिन होसेन, इम्रुल कायेस, अबू हिदर, अराफत सनी, नासिर होसेन.

पाकिस्तान : शाहिद आफ्रिदी (कर्णधार), मोहम्मद हफिझ, शरजील खान, खुर्रम मंझूर, उमर अकमल, शोएब मलिक, मोहम्मद आमिर, वहाब रियाझ, सर्फराझ अहमद (यष्टीरक्षक), मोहम्मद इरफान, मोहम्मद सामी, मोहम्मह नवाझ, अन्वर अली, इफ्तिकार अहमद, इमाद वासिम.

वेळ : रात्री ७.०० वाजल्यापासून.

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, ३ आणि एचडी १,३ वाहिन्यांवर.

Story img Loader