नागपूर : सुप्रसिद्ध क्रिकेटपटू व भारतरत्न सचिन तेंडुलकर खासदार महोत्सवाच्या निमित्ताने १२ जानेवारीला नागपुरात येत आहेत. सायंकाळी पाच वाजता यशवंत स्टेडियमवर त्यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होईल.
यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी,पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे,महापौर नंदा जिचकार प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.
गेल्यावर्षी याच कार्यक्रमाला सचिन येणार होता. मात्र, त्या दिवशी मुसळधार पाऊस झाल्याने दौरा रद्द करण्यात आला होता. शनिवारच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने तो येत असल्याने क्रीडाप्रेमींमध्ये कमालीची उत्सुकता आहे. त्याची एक झलक बघण्यासाठी तसेच तो काय बोलणार, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
सायंकाळी पाच वाजता विशेष विमानाने त्याचे आगमन होईल. विमानतळावरून तो थेट कार्यक्रमास्थळी पोहोचेल आणि कार्यक्रम आटोपताच तो मुंबईकडे रवाना होईल. यावेळी रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील गतविजेत्या विदर्भ संघातील खेळाडूंचा आणि प्रशिक्षकांचा सत्कार सचिनच्या हस्ते करण्यात येणार आहे.