टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताला अखेर सुवर्णपदक मिळाले आहे. भालाफेकपटू नीरज चोप्राने ट्रॅक अँड फील्डमध्ये भारताला सुवर्णपदक जिंकून दिले. त्याने अंतिम फेरीत ८७.५८ मीटर लांब भाला फेकत सुवर्ण पटकावले. नीरजने पहिल्या प्रयत्नात ८७.०३ मीटर आणि दुसऱ्या प्रयत्नात ८७.५८ मीटर भाला फेकला. त्याने तिसऱ्या प्रयत्नात ७६.७९ मीटर लांब भाला फेकला. चौथा आणि पाचवा प्रयत्न त्याचा फाऊल ठरला. सहाव्या प्रयत्नात त्याने ८० मीटरपेक्षा जास्त भाला फेकत नव्या इतिहासाची नोंद केली.

या कामगिरीनंतर उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी नीरजबाबत हटके ट्वीट केले आहे. महिंद्रा यांनी नीरजला बाहुबलीची उपमा देत ”आम्ही सगळे तुझ्या सैन्यात आहोत”, असे एक ट्वीट केले आहे. नीरजसह १२ स्पर्धक अंतिम फेरीत होते. वेबर (जर्मनी), वेडलेच (चेक रिपब्लिक), वेटर (जर्मनी), कॅटकवेट्स (बेलारूस), नदीम (पाकिस्तान), मियालेस्का (बेलारूस), मारडारे (मोल्डोवा), व्हेसेली (चेक रिपब्लिक), नोवाक (रोमानिया), इटेलाटालो (फिनलँड), अॅम्ब (स्वीडन) हे स्पर्धक होते.

 

चेक प्रजासत्ताकचा जेकब वेडलेच ८६.६७ मीटर थ्रोसह दुसरा आला. त्याचबरोबर याच देशाचा विटेस्लाव व्हेसेली ८५.४४ मीटर थ्रोसह तिसऱ्या क्रमांकावर राहिला. नीरजने पात्रता फेरीत ८६.६५ मीटर भाला फेकत आपल्या गटात प्रथम स्थान मिळवले होते. हे भारताचे आतापर्यंतचे सर्वात यशस्वी ऑलिम्पिक ठरले आहे.

हेही वाचा – शेवटी सुवर्ण पदक जिंकलंच! टोक्योमध्ये नीरज चोप्रानं घडवला इतिहास!

१२१ वर्षांची प्रतीक्षा संपली

ट्रॅक आणि फील्ड इव्हेंट्स म्हणजे अॅथलेटिक्स हे कोणत्याही ऑलिम्पिक खेळांचे मुख्य आकर्षण असते, परंतु आजपर्यंत कोणत्याही भारतीयांनी या स्पर्धांमध्ये पदक जिंकले नाही. ब्रिटिश भारताकडून खेळत असलेल्या नॉर्मन प्रिचर्ड यांनी १९००च्या ऑलिम्पिकमध्ये अॅथलेटिक्समध्ये दोन पदके जिंकली होती, परंतु तो इंग्रज होता, भारतीय नव्हता. नीरजने भारताची १२१ वर्षांची प्रतीक्षा संपवली आहे