भारतीय महिला हॉकी संघाने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. भारतीय संघाने ऑस्ट्रेलियन संघाला १-० च्या फरकाने पराभूत करुन उपांत्यफेरीत प्रवेश केलाय. भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला पराभूत करण्याआधीच आयर्लंड आणि दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करण्याची किमया साधली होती. ४१ वर्षांच्या इतिहासात प्रथमच भारतीय महिला संघाने ऑलिम्पिकमध्ये इतकी चमकदार कामगिरी केलीय. तीन वेळा विश्वविजेता ठरलेल्या ऑस्ट्रेलियन संघाला पराभूत करण्याचा भीमपराक्रम भारतीय महिलांना करुन दाखवत मोठ्या थाटात उपांत्यफेरीत प्रवेश केलाय.

नक्की पाहा हे १० फोटो >> एक.. दोन.. तीन.. दे धक्का… भारताने विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाला पराभूत केल्यानंतरचे मैदानावरील फोटो

खेळ सुरु झाल्यानंतर पहिल्याच क्वार्टरमध्ये भारताच्या शर्मिला देवीला दुखापत झाल्याने मैदानाबाहेर जावं लागलं. पहिल्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघांना एकही गोल करता आला नाही. दुसऱ्या क्वार्टरमध्ये मात्र भारतीय महिला संघाने आपलं खातं उघडलं. जागतिक क्रमवारीमध्ये दुसऱ्या स्थानी असणाऱ्या ऑस्ट्रेलियन महिला संघाची बचाव फळी भेदत भारताच्या गुरजीत कौरने पेनल्टी शॉर्टवर गोल केला. या गोलसहीत पहिल्या हाफमध्ये भारताने १-० ची आघाडी मिळवली. भारताने ही आघाडी कायम ठेवत उपांत्यफेरीतील प्रवेश निश्चित केला.

भारतीय संघाच्या विजयानंतर सोशल नेटवर्किंगवरही मोठ्याप्रमाणात आनंद व्यक्त केला जात असून ट्विटरवरील टॉप ट्रेण्डींग विषयांपैकी अनेक हॅशटॅग हे याच सामन्यासंदर्भातील आहेत.

भारतीय पुरुषांचीही ऐतिहासिक कामगिरी

रविवारी भारतीय पुरुष हॉकी संघाने रविवारी ब्रिटनवर ३-१ असा शानदार विजय मिळवत ४९ वर्षांनंतर ऑलिम्पिक स्पध्रेच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. सामना संपल्याची शिटी वाजवल्यानंतर भारतीय हॉकीपटूंनी जल्लोष साजरा केला. भारताच्या यशात दिलप्रीत सिंग (७व्या मिनिटाला), गरुजत सिंग (१६व्या मिनिटाला) आणि हार्दिक सिंग (५७व्या मिनिटाला) यांनी मैदानी गोलची नोंद केली. ब्रिटनकडून सॅम वॉर्डने एकमेव गोलची नोंद केली. येत्या मंगळवारी होणाऱ्या उपांत्य फेरीत भारताची विश्वविजेत्या बेल्जियमशी गाठ पडणार आहे. बेल्जियमने उपांत्यपूर्व सामन्यात स्पेनला ३-१ असे हरवून उपांत्य फेरीत स्थान मिळवले. दुसरी उपांत्य लढत ऑस्ट्रेलिया-जर्मनीमध्ये होणार आहे.

मेजर ध्यानचंद, बलबिर सिंग यांसारख्या मातब्बर हॉकीपटूंमुळे आठ वेळा ऑलिम्पिक सुवर्णपदके जिंकणाऱ्या भारताने अखेरचे सोनेरी यश मॉस्कोमध्ये १९८०मध्ये मिळवले होते. परंतु त्यावेळी फक्त सहा संघांच्या समावेशामुळे उपांत्य लढत नव्हती. त्यामुळे त्याआधी १९७२च्या म्युनिक ऑलिम्पिकमध्ये भारताने अखेरची उपांत्य फेरी गाठली होती. परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानने भारताचा २-० असा पराभव केल्याने भारताची वाटचाल खंडित झाली होती.

Story img Loader