तुषार वैती
मेरी कोम, जगज्जेती बॉक्सर
नवी दिल्लीत झालेल्या महिलांच्या जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत सहाव्यांदा जगज्जेतेपद पटकावण्याची अभूतपूर्व किमया भारतीय बॉक्सर एम. सी. मेरी कोम हिने केली आहे. जागतिक स्पर्धेत तब्बल सहा सुवर्ण आणि एक रौप्य अशी कामगिरी करणारी मेरी कोम ही जगातील पहिली महिला बॉक्सर ठरली आहे. इतकेच नव्हे तर मेरी कोमला १०व्या जागतिक स्पर्धेतील सर्वोत्तम बॉक्सरच्या पुरस्काराने गौरवण्यात आले.
मणिपूरच्या या ३५ वर्षीय बॉक्सरने आपल्या दोन तपांच्या कारकीर्दीत अनेक खडतर प्रसंगांचा सामना करत हे यश मिळवले आहे. २००५ साली लग्न झाल्यानंतर जुळ्या मुलांच्या बाळंतपणानंतर विश्रांती घेऊन बॉक्सिंगमध्ये पुनरागमन करणाऱ्या मेरीने दोन जागतिक सुवर्णपदके पटकावली. त्यानंतर आता तीन मुलांचा सांभाळ करताना मेरीने आठ वर्षांनंतर पुन्हा एकदा जगज्जेतेपदाला गवसणी घातली. आयुष्यात अनेक अग्निदिव्यातून जाताना, अनेक सामाजिक तसेच राज्यसभेची खासदार म्हणून काम करताना मेरीने नियमितपणे बॉक्सिंगचा सराव केला आहे. खडतर तपश्चर्येमुळेच मेरीने दैदीप्यमान यश संपादन केले. या प्रवासाविषयी मेरी कोमशी केलेली ही खास बातचीत –
* सहाव्यांदा सुवर्णपदकावर नाव कोरशील, असे वाटले होते का?
जेव्हा मी रिंगणात उतरते, त्यावेळी हार किंवा जीत याचा फारसा विचार करत नाही. आपल्यातील सर्वोत्तम कामगिरी करायचे, इतकाच निर्धार मी मनाशी केलेला असतो. यावेळीही तेच केले. अंतिम फेरीत जेव्हा विजयी ठरले, त्यावेळी मला अश्रू थांबवता आले नाहीत. हा माझ्यासाठी भावनांची गुंतागुंत असलेला विजय होता. कारण या विजयात माझे कुटुंबीय, आई आणि पतीचा त्याग होता. संपूर्ण देशवासीयांनी मला पाठिंबा दिला आहे, त्यामुळे हा विजय मी त्यांनाच समर्पित करते.
* भारतात पहिल्यांदाच झालेल्या जागतिक स्पर्धेनंतर देशातील बॉक्सिंगचे चित्र पालटेल का?
भारतात पहिल्यांदाच महिलांच्या जागतिक बॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन करणे, ही मोठी सुरुवात म्हणावी लागेल. आता भारतासाठी अनेक स्पर्धाच्या आयोजनाची दारे खुली होतील. या स्पर्धेद्वारे हा खेळ देशातील अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत झाली. भविष्यात भारतात अनेक प्रतिष्ठेच्या स्पर्धाचे आयोजन करण्यात येईल, अशी आशा आहे. याच गतीने भारतीय बॉक्सिंगची वाटचाल सुरू राहिली तर अनेक युवा प्रतिभावान खेळाडू पुढे येतील. लव्हलिना बोर्गोहेन, सोनिया चहल आणि सिमरनजित ही तर सुरुवात आहे.
* महिलांच्या जागतिक बॉक्सिंग स्पर्धेतील भारताची ही सर्वोत्तम कामगिरी होती का?
भारतीय महिला बॉक्सर्सनी अद्वितीय अशी कामगिरी केली. २००६ नंतर महिला बॉक्सिंगमध्ये बरेच बदल झाले असून विजेतेपदासाठीची स्पर्धा तीव्र झाली आहे. अनेक जगज्जेते आणि युरोपियन विजेते खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले होते. जवळपास ६०पेक्षा अधिक देशांमधील ३०० खेळाडू विजेतेपदासाठी झुंजत होते. अशा परिस्थितीतही भारताने दमदार कामगिरी केली, असे मला वाटते. जर आपल्या बॉक्सर्सना अधिक लोकप्रियता आणि संधी मिळाली तर भविष्यात देशाला आणखीन पदके मिळतील.
* २०२० टोकियो ऑलिम्पिकविषयी काय सांगशील?
सध्या तरी निवृत्तीचा विचार माझ्या मनात डोकावत नाही. कारण मी २०२० टोकियो ऑलिम्पिककडे लक्ष केंद्रित करणार आहे. ऑलिम्पिकमध्ये माझ्या ४८ किलो वजनी गटाचा समावेश नसल्यामुळे मला आता ५१ किलो वजनी गटात लढावे लागणार आहे. पण टोकियो ऑलिम्पिकमध्ये देशाला सुवर्णपदक मिळवून देण्याचे ध्येय मी बाळगले आहे.
* भारतीय चाहत्यांच्या मिळालेल्या पाठिंब्याविषयी काय सांगशील?
घरच्या मैदानावर भारतीय चाहत्यांचा मिळालेला पाठिंबा अभूतपूर्व होता. घरच्या चाहत्यांसमोर खेळणे, हा अविश्वसनीय प्रवास असल्यामुळे मला पाठिंबा देण्यासाठी चाहत्यांनी तोबा गर्दी केली होती. देशवासीयांनी दिलेल्या प्रेमभावनेमुळेच मला अद्वितीय कामगिरी करता आली. त्यांच्या पाठिंब्याशिवाय हे शक्यच नव्हते. त्यामुळेच माझे हे सुवर्णपदक मी देशाला समर्पित करते.