भालाफेकपटू नीरज चोप्रा हा ट्रॅक अँड फील्ड इव्हेंट प्रकारात ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारा देशातील पहिला खेळाडू ठरला आहे. टोक्यो ऑलिम्पिकमध्ये नीरजने भालाफेकमध्ये ८७.५८ मीटर थ्रोसह सुवर्णपदक जिंकले. या कामगिरीनंतर भारतातून नीरजवर बक्षिसांचा वर्षाव करण्यात आला. पदक जिंकल्यानंतर नीरजने त्याच्या इन्स्टाग्रामवर पहिली पोस्ट केली, या पोस्टला अर्ध्या तासात साडेपाच लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

नीरज आपल्या इन्टाग्रामवरील पोस्टमध्ये म्हणाला, ”सध्या ही भावना जगतोय. तुमचा पाठिंबा आणि आशिर्वादामुळे मी या पातळीपर्यंत पोहोचलो. यासाठी संपूर्ण भारताचे आणि भारताबाहेरील लोकांचे आभार.” नीरज चोप्राच्या आधी बीजिंग ऑलिम्पिकमध्ये नेमबाज अभिनव बिंद्राने सुवर्ण पदक जिंकले होते. ऑलिम्पिकमधील भारताचे हे वैयक्तिक प्रकारातील दुसरे सुवर्ण पदक आहे. यापूर्वी भारताने हॉकीत ८ सुवर्ण पदके पटकावली आहेत.

 

हेही वाचा – Olympics : धोनीच्या टीमकडून नीरजला मोठं बक्षीस, सोबत ‘हे’ गिफ्टही देणार

भारत १९०० पासून ऑलिम्पिक स्पर्धेत भाग घेत आहे. ऑलिम्पिक स्पर्धा सर्वप्रथम १८९६ मध्ये ग्रीसच्या अ‍ॅथेंसमध्ये पार पडली होती. भारताने आतापर्यंत ऑलिम्पिक स्पर्धेत एकूण ९ सुवर्ण, ८ रौप्य आणि १५ कांस्यपदके पटकावली आहेत.

टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारत

टोक्यो ऑलिम्पिकमध्ये आतापर्यंत भारताला पदक मिळवून देणाऱ्यांमध्ये रौप्य (मीराबाई चानू), कांस्य (पी. व्ही. सिंधू), कांस्य (लव्हलिना बोर्गोहेन), कांस्य (भारतीय पुरुष हॉकी संघ), रौप्य (रविकुमार दहिया), कांस्य (पुनिया) आणि सुवर्ण (नीरज चोप्रा) यांचा समावेश आहे. टोक्यो ऑलिम्पिकच्या १८ स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडू सहभागी झाले होते. भारताकडून यावेळी १२६ स्पर्धकांनी स्पर्धेत भाग घेतलेला आहे.