टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेमध्ये भारतीय तिरंदाज प्रविण जाधव याने रशियाच्या गलसान बझारझापोव्हला अनपेक्षित धक्का दिलाय. प्रविणने तिरंदाजीमध्ये जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या गलसान बझारझापोव्हला हरवलं आहे. एलिमेनशन राऊण्डमध्ये प्रविणने ही भन्नाट कामगिरी केलीय. प्रविणने ही कामगिरी ३२ जणांच्या पहिल्या फेरीत केली असून पदकापर्यंत पोहचण्यासाठी त्याला किमान दोन विजय आवश्यक होते. मात्र अंतीम सोळा जणांच्या फेरीत प्रवीणचा अमेरिकेच्या तिरंदाजाने पराभव केल्याने त्याचं वैयक्तिक तिरंदाजी स्पर्धेतील आवाहन संपुष्टात आलं.

एलिमिनेशन राऊण्डमध्ये ३२ जणांच्या फेरीत प्रविणने गलसान बझारझापोव्हला पराभूत करत १६ जणांच्या फेरीत प्रवेश केला. मात्र येथे अमेरिकेच्या ब्रॅडी एलिसनने १/१६ च्या फरकाने त्याला पराभूत केलं.

कोण आहे प्रविण जाधव?

नेदरलँडमध्ये २०१९ साली पार पडलेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या पुरुष तिरंदाजी संघाने सांघिक स्पर्धेत धडाकेबाज कामगिरी करत रौप्यपदकाची कमाई केली होती. नॉर्वे, कॅनडा, चीन तैपेई, नेदरलँड यांसारख्या मातब्बर संघाला नमवत भारतीय संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला. मात्र अंतिम फेरीच चीनसमोर त्यांना पराभव स्विकारावा लागलेला. या संघामध्ये तरुणदीप राय, अतानु दास या मातब्बर खेळाडूंसोबत महाराष्ट्राच्या प्रविण जाधवनेही आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला डंका वाजवला होता. सातारा जिल्ह्यातल्या सरडे गावातून आलेल्या प्रविणचा प्रवास हा सर्वांनी प्रेरणा घेण्यासारखा आहे.

प्रविणची कुटुंब हे रोजंदारीवर काम करुन आपलं घर चालवतं. आयुष्यभर एका झोपडीत राहणाऱ्या जाधव कुटुंबाला हक्काच्या सोयी-सुविधांसाठी आतापर्यंत झगडत रहावं लागलं आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठीच प्रविणने आपल्या परिवाराचा विरोध पत्करुन तिरंदाजी शिकण्याचा निर्णय घेतला. नेदरलँडमध्ये झालेल्या स्पर्धेत प्रविणने सांघिक रौप्यपदकाची कमाई करत ऑलिम्पिक कोटा मिळवला आहे. याआधी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत २००५ साली भारतीय संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला होता. त्यामुळे २०१९ च्या भारतीय संघाच्या या कामगिरीला विशेष महत्व होतं.

नक्की पाहा >> ९७ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच देशाला पहिलं गोल्ड मेडल मिळवून दिलं; ५ कोटी रुपये, घर भेट म्हणून मिळालं

१० वर्षांपासून करतोय सराव…

दशकभरापूर्वी प्रविणने फलटण तालुक्यात प्रशिक्षणाला सुरुवात केली. प्रविणचे प्राथमिक शाळेतील शिक्षक बबन भुजबळ यांनी त्याला परिस्थितीवर मात करण्यासाठी क्रीडा क्षेत्राकडे वळण्याचा सल्ला दिला. मात्र परिस्थिती हालाकीची असल्यामुळे प्रविण अॅथलेटिक्सकडे वळला. मात्र दोनवेळा जेवणाची भ्रांत असलेल्या प्रविणला ही गोष्ट जमली नाही. कित्येकदा सरावादरम्यान तो चक्कर येऊन पडायचा. यानंतर भुजबळ यांनी प्रविणच्या आहाराची काळजी घेतली. कालांतराने प्रविणने तालुका आणि जिल्हा पातळीवर स्पर्धेत ४०० मी. आणि ८०० मी. च्या शर्यतीत पदक मिळवण्यास सुरुवात केली. यादरम्यान महाराष्ट्र सरकारच्या क्रीडा प्रबोधिनी प्रकल्पाअंतर्गत प्रविणला प्रशिक्षित व्यक्तींकडून मार्गदर्शन मिळवण्याची संधी मिळाली.

वडिलांचा होता विरोध…

“क्रीडा प्रबोधिनीमध्ये प्रवेश मिळवण्याआधी झालेल्या परीक्षेमध्ये प्रविणला हा तिरंदाजीसाठी योग्य असल्याचं, प्रशिक्षकांचं मत पडलं. त्याच्या दंडांची ठेवण, शाररिक ताकद ही या खेळासाठी योग्य असल्याचं आम्हाला जाणवलं. त्यामुळे आम्ही प्रविणची तिरंदाजीसाठी निवड केली.” प्रविणचे प्रशिक्षक प्रफुल्ल डांगे यांनी २०१९ च्या विजयानंतर द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना दिली होती. प्रविणच्या वडिलांनी मात्र त्याला विरोध केला. प्रविणने गावातील कपड्याच्या दुकानात काम करावं अशी त्यांची इच्छा होती. या दुकानात प्रविणला महिना पगारही मिळणार होता. मात्र आपल्या घराला हालाकीच्या परिस्थितीमधून बाहेर काढण्यासाठी हा एकमेव उपाय असल्याचं प्रविणला समजलं होतं.

अशी झाली सुरुवात…

सुरुवातीला प्रविणने बांबुपासून तयार केलेल्या धनुष्य-बाणाने सराव करण्यास सुरुवात केली. कालांतराने प्रविणने या खेळात गती पकडत सर्व प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकण्यास सुरुवात केली. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी झालेल्या सराव चाचणीत प्रविणने तरुणदीप रायनंतर सर्वाधिक गुणांची कमाई केली. वर्षभरापूर्वी प्रविण हा स्पोर्ट्स कोट्याअंतर्गत भारतीय लष्करात दाखल झाला. नोकरी लागल्यानंतरही प्रविणच्या परिवाराने त्याला खेळ सोडून नोकरीवर लक्ष केंद्रीत करण्यास सांगितलं. मात्र त्याचे प्रशिक्षक जाधव आणि भुजबळ यांनी वेळीच लक्ष घालत प्रविणला तिरंदाजी खेळत राहण्याचा सल्ला दिला होता त्याने आपला फॉर्म कायम राखला तर आगामी टोकियो ऑलिम्पिकमध्ये त्याला नक्की संधी मिळेल असा विश्वास प्रविणच्या प्रशिक्षकांनी दोन वर्षांपूर्वीच व्यक्त केलेला. जो आज प्रविणने खरा करुन दाखवलाय.

नक्की पाहा >> आपल्याला काय दिसतं अन् कष्ट किती असतं… ९७ वर्षानंतर देशाला ‘गोल्ड’ मिळवून देणारे ‘Golden Hands’ पाहिलेत का?

२०१९ च्या स्पर्धेआधी कुटुंबाशी बोलताही आलं नव्हतं कारण…

जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत रविवारी झालेल्या अंतिम फेरीआधी प्रविण आपल्या परिवाराशी धड बोलूही शकला नाही. रोजंदारीवर काम करणारं प्रविणचं कुटुंब कामासाठी बाहेर गेल्यामुळे प्रविण त्यांच्याशी नीट बोलू शकला नाही. प्रविणने आपल्या मित्राला चौकशी करायला सांगितल्यानंतर, घरच्यांचा फोन तुटल्याचं त्याला समजलं. त्यामुळे प्रविणच्या मनात आपल्या घरच्यांची चिंता कायम होती. घरी गेल्यावर आपल्या परिवाराला नवीन फोन देण्याची इच्छा तेव्हा प्रविणने व्यक्त केलेली. दोनवेळचं जेवण मिळेल की नाही याची भ्रांत असलेल्या घरात, एक नवीन फोन घेण्याची हिंमत मी या खेळामुळेच करु शकलो असं प्रविण सांगतो.

Story img Loader