भारतीय पुरुष हॉकी संघाने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये गतविजेत्या अर्जेटिनाला साखळी फेरीमधील सामन्यात धूळ चारली आहे. भारताने अर्जेंटीनाविरुद्धचा सामना ३-१ च्या फरकाने जिंकला आहे. या विजयासोबतच भारताने उपांत्यपूर्व फेरीत धडक मारलीय. भारताने आपल्या चौथ्या सामन्यामध्ये २०१६ मधील रिओ ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या अर्जेंटिनाच्या संघावर ३-१ च्या फरकाने विजय मिळवला. भारताने आपल्या चार सामन्यांपैकी तीन सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. भारताने न्यूझीलंड, स्पेन आणि अर्जेंटीनाला धूळ चारलीय. भारताला या स्पर्धेमध्ये केवळ ऑस्ट्रेलियाने पराभूत केलं आहे. अ गटाच्या अंतिम सामन्यामध्ये भारत ३० जुलै रोजी जपानविरुद्ध मैदानात उतरणार आहे.

नक्की पाहा >> ९७ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच देशाला पहिलं गोल्ड मेडल मिळवून दिलं; ५ कोटी रुपये, घर भेट म्हणून मिळालं

या सामन्यामध्ये भारत आणि अर्जेंंटिना दोन्ही संघांनी सावध सुरुवात केली. पहिल्या क्वार्टरमध्ये एकही गोल झाला नाही. दुसऱ्या क्वार्टरमध्येही एकाही संघाला गोल करता आला नाही. पहिल्या हाफपर्यंत दोन्ही संघ गोलशून्यच्या बरोबरत होते. पहिल्या ३० मिनिटांमध्ये एकाही संघाला पेनल्टी कॉर्नरची संधी मिळाली नाही. सामन्याच्या ४३ व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवरच वरुण कुमारने भारताकडून पहिला गोल करत सामन्यात भारतीय संंघाला १-० च्यी आघाडी मिळवून दिली.

अर्जेंटीनाने चौथ्या क्वार्टरमध्ये सामन्यामध्ये आपला पहिला गोल केला. ४८ व्या मिनिटाला म२को स्कूथने पेनल्टी कॉर्नरवर गोल करत सामना १-१ च्या बरोबरीत आणला. त्यानंतर दोन्ही संघ अगदीच आक्रामक पद्धतीने खेळ करताना दिसले. भारताकडून ५८ व्या मिनिटाला विवेक सागरने गोल करत भारताला २-१ ची आघाडी मिळवून दिली. त्यानंतर पुढच्याच मिनिटाला म्हणजेच सामन्याच्या ५९ व्या मिनिटाला हरमनप्रीत सिंहने पेनल्टी कॉर्नरवर गोल करत भारताची आघाडी ३-१ वर नेली आणि भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. भारताला या सामन्यात एकूण ८ कॉर्नर मिळाले. त्यापैकी दोनमध्ये भारताला गोल करण्यात यश आलं.

नक्की वाचा >> Tokyo Olympics : पी. व्ही. सिंधूची उपांत्यपूर्व फेरीत धडक; पदकापासून केवळ दोन विजय दूर

ऑस्ट्रेलियाकडून झालेल्या दारुण पराभवानंतर निराश झालेल्या भारतीय पुरुष हॉकी संघाने या आधीच्या सामन्यात दमदार पुनरागमन केलं होतं. भारतीय पुरुष हॉकी संघाला अ-गटातील दुसऱ्या लढतीत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या ऑस्ट्रेलियाकडून १-७ अशा दारुण पराभवाला सामोरे जावं लागलं होतं. मात्र या पराभवानंतर भारताने आपल्या तिसऱ्या सामन्यात स्पेनचा ३-० ने धुव्वा उडवला होता. आजच्या सामन्यातही भारताचा हाच आक्रामक खेळ पहायला मिळाल्याने भारतीय चाहत्यांच्या संघाकडून अपेक्षा वाढल्यात.

Story img Loader