जगातील अव्वल क्रमांकाचा टेनिसपटू नोव्हाक जोकोव्हिचचे टोक्यो ऑलिम्पिकमध्ये ‘गोल्डन स्लॅम’ पूर्ण करण्याचे स्वप्न धूळीस मिळाल्यानंतर त्याचे कांस्यपदकही हुकले आहे. त्यामुळे तो आता टोक्योहून रिकाम्या हाताने माघारी परतेल. कांस्यपदकाच्या लढतीत सहाव्या मानांकित स्पेनच्या पाब्लो बुस्टाने सर्बियाच्या जोकोव्हिचला ६-४, ६-७ (६-८), ६-३ असे नमवले. सामन्यादरम्यान, जोकोव्हिचचा बऱ्याच वेळा संयम सुटला आणि त्याने राग रॅकेटवर काढला.

तिसऱ्या सेटदरम्यान बुस्टाचा फटका रोखण्यात अपयशी ठरल्यानंतर जोकोव्हिचने स्टँडच्या दिशेने रॅकेट फेकले. दोन सामन्यांनंतर, जेव्हा बुस्टाने त्याची सर्व्हिस मोडून काढली, तेव्हा त्याने पुन्हा एकदा त्याच्या रॅकेट नेटवर मारले. त्यानंतर त्याने हे रॅकेट उचलले आणि फोटोग्राफर्सच्या दिशेने फेकले.

 

 

रॅकेट नेटवर फेकल्यानंतर चेअर अंपायरने जोकोव्हिचला वॉर्निंग दिली, पण ही दुसरी घटना असल्याने बुस्टाने पंचांकडून पेनल्टी पॉइंटची मागणी केली. मात्र, पहिल्या घटनेनंतर पंचांनी जोकोव्हिचला वॉर्निंग दिली नव्हती.

हेही वाचा – एकेकाळी ‘मॅगी’वर पोट भरणाऱ्या पंड्या बंधूंची कमाल..! मुंबईत खरेदी केला ‘इतक्या’ कोटींचा फ्लॅट

२४ तासांपेक्षा कमी वेळात जोकोव्हिचला तिसऱ्यांदा पराभवाला सामोरे जावे लागले. अलेक्झांडर ज्वेरेवने शुक्रवारी पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत त्याचा पराभव केला. यानंतर त्याला मिश्र दुहेरीच्या उपांत्य फेरीतही पराभवाला सामोरे जावे लागले. एकाच वर्षी चारही ग्रँडस्लॅमसह ऑलिम्पिक सुवर्ण जिंकणे याला गोल्डन स्लॅम म्हटले जाते. महिला खेळाडू स्टेफी ग्राफ (१९८८) अशी कामगिरी करणारी एकमेव टेनिसपटू आहे.

Story img Loader