विश्वविजेत्या पी. व्ही. सिंधूने गुरुवारी ऑलम्पिकच्या महिला एकेरी बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरी गाठली. रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकणाऱ्या सिंधूने डेनमार्कच्या मिया ब्लिचफेल्डचा दोन सरळ सेटमध्ये पराभव करत उपांत्यपूर्वी फेरीत आपला प्रवेश निश्चित केला. जागतिक क्रमवारीत सातव्या क्रमांकावरील सिंधूने उपउपांत्यपूर्व फेरीत डेन्मार्कच्या क्रमवारीत १२ व्या स्थानावरील मिया ब्लिकफेल्डचा ४० मिनिटांमध्ये २१-१५, २१-१३ अशा फरकाने पराभव केला. त्यामुळे आता सिंधू पदकापासून केवळ दोन विजय दूर आहे. या विजयामुळे सिंधूची मियाविरुद्धची आतापर्यंतच्या सामन्यांमधील सिंधूची कामगिरी ५-१ अशी झालीय. म्हणजेच या दोघींमध्ये झालेल्या सहा सामन्यांपैकी पाच सामने सिंधूने जिंकलेत.
नक्की पाहा >> ९७ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच देशाला पहिलं गोल्ड मेडल मिळवून दिलं; ५ कोटी रुपये, घर भेट म्हणून मिळालं
सिंधूने या सामन्यामध्ये मियाच्या विरुद्ध खेळताना चांगली सुरवात केली. पहिल्या सेटमध्ये काही वेळ सिंधू ११-६ ने आघाडीवर होती. त्यानंतर स्कोअर १३-१० झाला. त्यानंतर १६-१२ असा स्कोअर झाला. मात्र मियाने दमदार कमबॅक केल्याने सामना १६-१५ पर्यंत आला. मात्र नंतर सिंधूने सामन्यावरील पकड मजबूत करत लागोपाठ पाच पॉइण्ट जिंकत पहिला सेट २१-१५ च्या फरकाने आपल्या नावावर केला. पहिला सेटमध्ये २२ मिनिटांचा खेळ झाला.
#TokyoOlympics| Badminton, Women’s singles Round of 16: PV Sindhu beats Denmark’s Mia Blichfeldt 21-15, 21-13 pic.twitter.com/GvaJAewICk
— ANI (@ANI) July 29, 2021
दुसऱ्या सेटमध्येही सिंधूने चांगली सुरुवात केली आणि ५-० ची आघाडी मिळवली. त्यानंतर मियाने चांगला खेळ करत स्कोअर ३-६ पर्यंत आणला. मात्र हाफ टाइमपर्यंत सिंधूने ११-६ च्या फरकाने आघाडी घेतली होती. शेवटी तिने २१-१३ च्या फरकाने दुसरा सेटही जिंकला. हा सेट १९ मिनिट चालला. आता सिंधू महिला बॅडमिंटच्या एकेरी स्पर्धेत अंतिम ८ खेळाडूंमध्ये आहे.
नक्की वाचा >> Tokyo Olympics Hockey: चक दे इंडिया… भारताने सुवर्णपदक विजेत्या अर्जेंटिनाला धूळ चारली; उपांत्यपूर्व फेरीत स्थान निश्चित
यापूर्वीच्या सामन्यामध्येही सिंधूने दोन सरळ सेटमध्ये विजय मिळवला होता. उपउपांत्यपूर्वी फेरीमधील आपला प्रवेश निश्चित करताना सिंधूने जागतिक क्रमवारीत ३४व्या क्रमांकावर असलेल्या हाँगकाँगच्या नॅन यि चेऊंगला पराभूत केलेलं. सिंधूने चेऊंगचा ३५ मिनिटांत २१-९, २१-१६ असा पराभव केलेला. सिंधूने चेऊंगविरुद्धच्या सहाव्या सामन्यातही सरशी साधली. या सामन्यात सिंधूने पहिल्याच गेममध्ये आरामात विजय मिळवत चेऊंगवरील दडपण वाढवले. परंतु दुसऱ्या गेममध्ये चेऊंगने तिला तोलामोलाची टक्कर दिली.
उपांत्यपूर्व फेरीमध्ये सिंधूचा सामना जपानच्या अकाने यामागुचीविरुद्ध होण्याची शक्यता आहे. मागील दोन वेळेच्या ऑलिम्पिकबद्दल बोलायचं झाल्यास दोन्ही वेळेस भारताला बॅडमिंटनमध्ये पदक मिळालं होतं. २०२१ मध्ये सायना नेहवालने कांस्यपदक जिंकलं होतं. तर त्यानंतर २०१६ मध्ये रिओ ऑलम्पिकमध्ये सिंधूने रौप्यपदकावर आपलं नाव कोरलं होतं.