संदीप कदम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : जगभरात होणाऱ्या विविध ट्वेन्टी-२० लीगमुळे कसोटी क्रिकेट हे मागे पडल्याचे चित्र आहे. मात्र, कसोटी क्रिकेट हे आजही सर्वांत महत्त्वाचे असल्याची भावना न्यूझीलंडचा क्रिकेटपटू टॉम लॅथमने व्यक्त केली.

ट्वेन्टी-२० क्रिकेटची वाढती लोकप्रियता पाहता कसोटी क्रिकेटचे अस्तित्व टिकवण्यासाठी काय केले पाहिजे, असे विचारले असता लॅथम म्हणाला, ‘‘ट्वेन्टी-२० क्रिकेट वाढले आहे, यात शंका नाही. मात्र, माझ्या मते कसोटी क्रिकेटच सर्वांत महत्त्वाचे आहे. कोणत्याही क्रिकेटपटूला विचारल्यास कसोटीच आपला आवडता प्रकार असल्याचे तो सांगेल. आगामी पाच ते दहा वर्षांत क्रिकेट कोणत्या दिशेला जाईल, हे सांगणे अवघड आहे. मात्र, कसोटी क्रिकेटचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी चाहत्यांनी कसोटी सामने पाहण्यासोबतच युवा खेळाडूंनी ते खेळणेही तितकेच गरजेचे आहे. गेल्या पाच वर्षांत ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये मोठी वाढ झाली आहे. युवा खेळाडू या प्रारूपाकडे अधिक वळत आहेत. परंतु कसोटी सामनेही रोमांचक असतात. सध्या कसोटी क्रिकेटमध्ये खेळाडू अधिक आक्रमतेने खेळताना दिसतात, जे पाच ते दहा वर्षांपूर्वी होत नव्हते. मला कसोटी क्रिकेट खेळायला खूप आवडते.’’

हेही वाचा >>>PBKS vs RR : रोमहर्षक सामन्यात राजस्थानचा पंजाबवर ३ विकेट्सनी निसटता विजय, शिमरॉन हेटमायरची निर्णायक खेळी

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचाही कसोटीचे अस्तित्व टिकवण्यासाठी फायदा होत असल्याचे लॅथमला वाटते. ‘‘जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या रूपाने कसोटीत आलेली नावीन्यता ही खरेच चांगली आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून क्रिकेटमध्ये बऱ्याच गोष्टी पहिल्यांदाच घडत आहे आणि दोन वर्षांचे कसोटीचक्र संपल्यानंतर बक्षीस मिळणे खूप चांगले आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद ही स्पर्धा क्रिकेटसाठी नक्कीच फायदेशीर आहे.’’

आगामी काळात न्यूझीलंडचा संघ भारत दौरा करणार आहे. या दौऱ्याबद्दल लॅथम म्हणाला, ‘‘गेल्या काही भारत दौऱ्यावर आम्हाला अपेक्षित निकाल मिळालेला नाही. मात्र, यंदा आमचा प्रयत्न विजय मिळवण्याचा राहील. जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या दृष्टीने हा दौरा आमच्यासाठी महत्त्वाचा असणार आहे. सर्व खेळाडू भारतात खेळण्यासाठी उत्सुक असतात. भारतात प्रत्येक ठिकाणी खेळण्याची आव्हाने वेगळी आहेत. आम्ही चांगले क्रिकेट खेळू शकलो, तर नक्कीच आम्ही तेथे जिंकण्याच्या स्थितीत असू.’’ सोनी स्पोर्ट्स नेटवर्कला सात वर्षांसाठी न्यूझीलंड क्रिकेटचे विशेष प्रसारण अधिकार मिळाले आहेत.

रचिन, कॉन्वे प्रतिभावान खेळाडू

‘‘रचिन रवींद्र हा न्यूझीलंडसाठी काहीच वर्षे खेळला आहे, पण मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये त्याने मिळालेल्या संधीचा फायदा घेतला आहे. विश्वचषकादरम्यान तो ज्या प्रकारे खेळला, ते फार विलक्षण होते. त्याच्याकडे चांगले फटके आहेत. गेल्या दीड वर्षांत त्याच्या खेळतील स्तर पाहता त्याने अशाच पद्धतीने खेळामध्ये सातत्य राखल्यास तो जगातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक होईल. तसेच डेव्हॉन कॉन्वेला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये संधी मिळण्यासाठी थोडी प्रतीक्षा करावी लागली. मात्र, त्यानंतर त्याने आपली छाप पाडली. त्याच्या रूपाने क्रिकेटच्या तीनही प्रारूपांत चांगली कामगिरी करू शकणारा खेळाडू आम्हाला मिळाला,’’ असे रचिन आणि कॉन्वेचे कौतुक करताना लॅथम म्हणाला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tom latham believes that test cricket is the most important sport news amy
Show comments