जर्मनीला विश्वविजेतेपद मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलणाऱ्या टोनी क्रूसला रिअल माद्रिद या क्लबने करारबद्ध केले आहे. बायर्न म्युनिककडून टोनी क्रूसला सहा वर्षांसाठी रिअल माद्रिदने विकत घेतले आहे. उपांत्य फेरीत ब्राझीलविरुद्ध ७-१ असा विजय मिळवणाऱ्या जर्मनीच्या विजयात टोनी क्रूसने दोन गोल लगावत मोलाचा हातभार लावला होता. त्यानंतर अर्जेटिनाविरुद्धच्या अंतिम सामन्यातही त्याने चमकदार कामगिरी केली होती. ‘‘सध्याच्या घडीला सर्वोत्तम खेळाडू असलेल्या टोनी क्रूसला आम्ही करारबद्ध केले आहे. प्लेमेकर म्हणून त्याने साकारलेली कामगिरी खरोखरच वाखाणण्याजोगी आहे,’’ असे क्लबच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. २०१३ चॅम्पिन्स लीग, बुंडेसलीगा जेतेपद आणि क्लब विश्वचषक तसेच फिफा विश्वचषक अशी मिळून त्याच्या नावावर ११ जेतेपदे आहेत.